मोनोच्या एका ट्रीपसाठी स्कोमी इंजिनीयरिंगने मागितले १८ हजार रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-monorail-001

सामना प्रतिनिधी । मुंबई

मोनोरेल सुरू होण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे. पण मोनोचा प्रवास मुंबईकरांसाठी महागडा होणार आहे. मोनो चालवण्यासाठी इच्छुक असलेल्या कंपनीने मोनोच्या एका ट्रीपसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे १८ हजार रुपये मागितले आहेत.

मोनोरेल चालवण्यासाठी एमएमआरडीए आणि लार्सन ऍण्ड टुब्रो-स्कोमी इंजिनीयरिंग (एलटीएसई) यांच्यात बोलणी सुरू आहेत. अंतिम निर्णय झाला तर येत्या ऑक्टोबरपासून मोनोरेल ट्रकवर येऊ शकेल. मोनो रेल्वेची एक ट्रीप २० किलोमीटरची आहे. त्यासाठी एमएमआरडीएने ३१३१ रुपये देऊ केले आहेत, परंतु तो सौदा परवडणारा नसल्याचे एलटीएसईचे म्हणणे आहे. एसटीएसईच्या प्रतिनिधींची यासंदर्भात एमएमआरडीएचे अध्यक्ष आर. ए. राजीव यांच्याशी नुकतीच बोलणी झाली. त्यासाठी स्कोमी इंजिनीयरिंगचे हिंदुस्थानातील प्रमुख मलेशियाहून मुंबईत आले होते, परंतु त्या बैठकीत काही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही.

सध्या मुंबईत मोनोरेलच्या १५ पैकी १० गाड्या उपलब्ध आहेत, परंतु त्यातील तीन गाड्या अनफिट आहेत. उर्वरित पाच गाड्या पुरवण्याबरोबरच नादुरुस्त असलेल्या तीन गाड्यांची दुरुस्ती करण्याची तयारी एलटीएसईने दर्शवली आहे अशी माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिली. डिसेंबरपर्यंत या तीन गाड्यांची दुरुस्ती होईल आणि पाच नव्या गाड्या जून २०१९ पर्यंत मुंबईत पोहोचतील असे सांगितले जाते.

दोन्ही टप्पे एकाच वेळी सुरू झाल्यास एक गाडी २२ मिनिटांनी
चेंबूर-वडाळा-जेकब सर्पल असा मोनोरेलचा २० किलोमीटरचा मार्ग आहे. सुरुवातीला मोनोचा चेंबूर ते वडाळा हा ८.९ किलोमीटरचा पहिला टप्पा सुरू होईल. गाड्यांची फ्रिक्वेन्सी चांगली राहावी यासाठी टप्प्याटप्प्यानेच मोनोरेल सुरू करण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे. दोन्ही टप्पे एकाच वेळी सुरू केले तर एका गाडीसाठी प्रवाशांना २२ ते २५ मिनिटे वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.