
आता दर 18 मिनिटांऐवजी दर 5 मिनिटांनी मोनो रेल धावू शकणार आहे. दहा नवीन मोनो ट्रेन बनविण्यासाठीचे 590 कोटींचे टेंडर हैदराबादच्या मेधा सर्वो ड्राइव्हज प्रा.लि. कंपनीला मिळाले आहे. जानेवारी 2023पर्यंत पहिली ट्रेन ताफ्यात येणार असून अखेरची ट्रेन 2024 पर्यंत दाखल होणार आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार होणाऱया या संपूर्ण स्वदेशी मोनोरेलच्या नवीन ट्रेन वजनाने हलक्या आणि वेगवान असणार असून त्यातून जादा प्रवासी वाहतूक करणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.
एमएमआरडीए सध्या संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर व्हाया वडाळा अशी मोनोरेल सेवा देत आहे. या मार्गाची लांबी 20 कि.मी. असून हा मार्ग फिडर रूट म्हणून मेट्रोला पूरक सेवा देणार आहे. मोनोरेलमधून दर तासाला एका दिशेला 7,500 प्रवाशांची वाहतूक करणे शक्य असून दररोज दीड ते दोन लाख प्रवाशांची वाहतूक करण्याची तिची क्षमता आहे. राईट्सने 2008मध्ये तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार 2031पर्यंत दीड लाख असणारी प्रवाशी संख्या 2041पर्यंत 3 लाख होणार आहे. परंतु सध्या मोनोरेलच्या फेऱयांमध्ये खूप अंतर असल्याने प्रवाशांनी तिच्याकडे पाठ फिरवली आहे.
स्टेनलेस स्टीलचे डबे व अधिक प्रवासी वाहतूक
नव्या दहा ट्रेन आधीच्या ट्रेनपेक्षा हलक्या आणि वेगवान असणार असून त्यांच्यात प्रवासी वाहण्याची क्षमताही अधिक असणार आहे. सध्या दर ट्रेनमागे एकूण 560 प्रवाशांच्या वाहतुकीची क्षमता आहे. त्यात वाढ होणार आहे. नव्या ट्रेन ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार करण्यात येत असल्याने त्यांच्या देखभालीचा खर्चही कमी असणार आहे. तसेच मेट्रो ट्रेनप्रमाणे नव्या मोनोरेलचे कोच स्टेनलेस स्टीलचे असल्याने ते ज्यादा टिकाऊ असणार आहेत. या ट्रेनच्या समावेशाने सध्या दोन ट्रेनमागे असणारे 18 मिनिटांचे अंतर कमी होऊन दर 5 मिनिटांनी एक ट्रेन सोडणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवासी वाढून महसुलात वाढ होण्यास मदत होणार आहे.






























































