परतीची तारीख उलटून गेल्यावरही मान्सून देशभरात सक्रिय

7370

अर्धा सप्टेंबर उलटूनही राज्यासह देशभरात सक्रिय असलेला मान्सून परतीच्या वाटेला लागण्याची चिन्हं नाहीत. सर्वसाधारणतः 1 सप्टेंबर ही मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची तारीख मानण्यात येते. मात्र, या तारखेला दोन आठवडे उलटून गेले तरी पाऊस परतलेला नाही. उलट त्याचा जोर कायम असल्याचं चित्र आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा हे या मान्सूनच्या तीव्रतेमागील मुख्य कारण आहे. त्यामुळे देशाच्या मध्य भागासह अन्य ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत 34 टक्के अधिक पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. हे प्रमाणही येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे. कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम 21 सप्टेंबरपर्यंत दिसायला लागेल आणि पाऊस सुरू राहिल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

परतीच्या तारखेनंतरही रेंगाळलेल्या पावसाबाबत चिंता नसल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. कारण, यापूर्वी फक्त 2015मध्येच 4 सप्टेंबरनंतर लगेचच परतीच्या पावसाला सुरुवात झाली होती. गेल्या दशकात बऱ्याचदा 20 सप्टेंबरनंतरच परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाही थोडी वाट बघायला हरकत नसल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या