
कोरोनामुळे आलेली मरगळ बुधवारी हवामान खात्याने झटकली. यंदा पाऊस चांगला मेहेरबान होणार असल्याचा पहिला अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. विशेष म्हणजे यंदा प्रथमच मान्सूनच्या आगमनाची व परतीची तारीख बदलण्यात आली आहे.
कोरोनामुळे अवघ्या जगावर भयंकर मरगळ आली आहे. सर्वत्र औदासिन्याची छटा असून शेती, शेतकरी यांच्यावर या संकटाची पडछाया आहे. अशा सगळय़ा मळभाच्या वातावरणात आज हवामान खात्याने यंदा पाऊस चांगला पडणार असल्याची खुशखबर दिली. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. राजीवन तसेच हवामान खात्याचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
– मान्सून नेहमीप्रमाणेच एक जून रोजी केरळाच्या किनारपट्टीवर दाखल होणार आहे. 30 सप्टेंबरनंतर पावसाचा परतीचा प्रवास चालू होईल असे ते म्हणाले. यंदा प्रथमच मान्सूनच्या येण्याचा व जाण्याचा मुहूर्त म्हणजेच तारखांमध्ये बदल करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. संपूर्ण देशभरात मान्सून मेहेरबान होणार असून 96 ते 104 टक्के पाऊस होण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. आज जाहीर करण्यात आलेला अंदाज हा पहिलाच आहे. मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवडय़ात विभागवार अंदाज जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
– डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मान्सूनच्या देशभरातील प्रवासाचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती दिली. बदलत्या हवामानामुळे मान्सूनच्या प्रवासात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे पावसाच्या अंदाजावरही त्याचा परिणाम होतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन हवामान खात्याने 1950 मध्ये निश्चित करण्यात आलेल्या मान्सूनच्या आराखडय़ाचा प्राधान्याने विचार केला असल्याचे डॉ. महापात्रा म्हणाले. यंदा पाऊस शंभर टक्के बरसणार असून शेती व शेतकऱयांसाठी फायद्याचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

























































