
देशभरात धुवांधार बरसलेल्या मान्सूनचे परतीचे तिकीट उद्या सोमवारचे आहे. तरीही तो अनधिकृतपणे आणखी आठवडाभर ठाण मांडणार असल्याचे समोर आले आहे. मान्सूनने आपल्या वेळापत्रकानुसार 30 सप्टेंबर रोजी काढता पाय घेणे आवश्यक आहे. वर्षानुवर्षे तो ही डेडलाइन पाळत आला आहे, मात्र यंदा छप्पर फाडके बरसूनही त्याची इच्छा काही पूर्ण झालेली दिसत नाही. त्यामुळेच तो आणखी आठवडाभर रेंगाळणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
मान्सूच्या अधिकृत आगमनाची तारीख 1 जून असून परतीची 30 सप्टेंबर आहे. यंदा मान्सून अंदमानात वेळेत दाखल झाला होता. तसेच त्याचा अखेरचा थांबा असलेल्या राजस्थानमधील गणगणापूर येथे 15 जुलै रोजी हजेरी लावली होती. तसेच यंदा देशात सरासरीपेक्षा 9 टक्के जादा पाऊस झाल्याने तो ठरलेल्या वेळेलाच निरोप घेईल असा हवामान खात्याचा अंदाज होता. पण तो आणखी आठवडाभर रेंगाळणार असल्याचे हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय माहापात्रा यांनी स्पष्ट केले. दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रात आठवडाभरात पावसाची शक्यता आहे. तसेच बिहार, उत्तर प्रदेश, झारखंडमध्ये 3 ऑक्टोबर रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याकडे 1960 पासून असलेले रेकॉर्ड पाहता मान्सून प्रथमच उशिरापर्यंत रेंगाळला असल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
येथे कोसळला रेकार्डब्रेक पाऊस
हवामान खात्याच्या मध्य विभागात येणाऱया महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात आणि गोव्यात यंदा सरसरीच्या 28 टक्के जादा पाऊस कोसळला आहे, तर दक्षिण विभागात येणाऱया कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामीळनाडू, अंदमान आणि निकोबार येथे सरासरीच्या 16 टक्के जास्त पाऊस झाला आहे.
उत्तर-पूर्व राज्यांत 13 टक्क्यांची घट
यंदा देशात सरासरीच्या 9 टक्के जादा पाऊस झाला असला तरी त्याला देशाच्या उत्तर-पूर्वेकडील राज्ये मात्र अपवाद ठरली आहेत. पश्चिम बंगाल, झारखंड, बिहारमध्ये सरासरीच्या 13 टक्के कमी पाऊस झाला आहे तर उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-कश्मीर आणि दिल्लीत सरासरीच्या 3 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

























































