आला पाऊस… केरळात; छत्री, रेनकोट काढायला मुंबईकर माळ्यावरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकऱयांसह सर्व जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. देवभूमी केरळमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सूनने वर्दी दिली आहे. 10-11 जूनपर्यंत महाराष्ट्राच्या काही भागात, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मान्सून दाखल होईल, अशी माहिती हिंदुस्थानच्या हवामान खात्याने (आयएमडी) दिली आहे.

दरवर्षी 1 जूनला मान्सून केरळमध्ये धडकतो. यावर्षी दोन दिवस उशीर आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सूनची वाटचाल झपाटय़ाने देशाच्या इतर भागाकडे सुरू आहे. तीन दिवस उशिरा जरी मान्सूनचे आगमन झाले असले तरी देशभरात सामान्य म्हणजे 16 ते 104 टक्के पाऊस कोसळेल. सरासरीच्या 101 टक्के पाऊस होईल, असा अंदाज आहे.

महाराष्ट्रात पुढील आठवडय़ात आगमन

10-11 जूनपर्यंत दक्षिण-पश्चिम मान्सून महाराष्ट्राच्या काही भागात तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात बरसेल. तेलंगणा, आंध्र प्रदेश, दक्षिण गुजरात, मध्य आणि दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगडचा काही भाग, झारखंड आणि दक्षिण ओडिशाचा भाग मान्सूनने व्यापला जाईल.

केरळात पाऊस आला म्हणजे मुंबईच्या उंबरठय़ावर नाही, पण हाकेच्या अंतरावर तरी नक्कीच आला आहे. म्हणूनच पावसाची वर्दी मिळताच मुंबईकरांनी घरातल्या पोटमाळय़ावर धाव घेतली आणि प्लॅस्टिक कागदात बांधून ठेवलेले रेनकोट, छत्र्या बाहेर काढल्या. अर्थात दोन दिवसांत या छत्र्यांना पावसाचे पाणी लागणारच आहे. कारण पुढील 48 तासांत मुंबईसह राज्यातील काही भागांत मान्सूनपूर्व सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अरबी समुद्र आणि उत्तर कोकणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार ते सोलापूरपर्यंत तसेच विदर्भ-मराठवाडय़ातही पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज आहे.