
अवकाळी पावसाच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकरीराजाची चिंता आणखी वाढली आहे. मोसमी पावसातही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडण्याची चिन्हे आहेत. यंदा सरासरीपेक्षा 94 टक्केच मोसमी पाऊस पडेल. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत 868.6 मि.मी.च्या आसपास पावसाची नोंद होईल, असे भाकीत ‘स्कायमेट’ या खाजगी संस्थेने सोमवारी वर्तविले. विशेषतः महाराष्ट्र, गुजरातसह उत्तर आणि मध्य हिंदुस्थानात मोसमी पावसाची विशेष तूट जाणवेल, असे ‘स्कायमेट’च्या अहवालात म्हटले आहे.
महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यांत कमी पाऊस पडेल. तसेच पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश व उत्तर हिंदुस्थानातील इतर काही भागांत ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी मोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत 15 एप्रिलला हवामानाची बदलती स्थिती लक्षात घेऊन सुधारित भाकीत केले जाईल, असे ‘स्कायमेट’चे जतीन सिंग यांनी सोमवारी जाहीर केले.
‘एल निनो’चा तीव्र परिणाम
मागील चार वर्षांत सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक मोसमी पावसाची नोंद झाली. मात्र यंदा ‘एल निनो’चा तीव्र परिणाम मान्सूनवर होईल. त्यामुळे मोसमी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खाली येईल.





























































