विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन- राज्याचा अर्थसंकल्प 28 जूनला

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून सुरू होत आहे. 28 जूनला  राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होईल. या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवत या अधिवेशनात लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. 12 जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.

पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठरवण्यासाठी विधान भवनात आज कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते.

अजित पवार गटाची बैठकीला दांडी

अर्थसंकल्पाच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची होती, पण वित्तमंत्री अजित पवार किंवा त्यांच्या गटाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये अजित पवार गटाकडून मंत्री छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील सदस्य आहेत, मात्र त्यांच्यापैकी कोणीही उपस्थित नव्हते.