मस्त भिजूया… महाराष्ट्रातील अनवट धबधबे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आसावरी जोशी

सह्याद्री हिरवाईने अंगोपांग मोहरलाय… अखंड कोसळणाऱ्या आभाळमायेने मनोमन सुखावलाय. ही आभाळमाया आता फक्त त्याच्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही तर त्याच्या कुशीतील लेकरांसाठीही अगदी भरभरून ओसंडून वाहते आहे… आणि हौशी पर्यटकही या कोसळधारेखाली मनमुराद चिंब होण्यासाठी आतुरले आहेत…

महाराष्ट्राला निसर्गाने सह्याद्रीचे अनवट देखणे वरदान दिले.. या वरदानातूनच कोसळणाऱ्या दुधधारा अजूनच खुलतात.. कधी त्या अगदी तलम दिसतात.. सायीसारख्या.. तर कधी रौद्र कोसळतात बेभान होऊन.. पाहूया आपल्या सह्याद्रीतील अनवट धबधब्यांचे सौंदर्य…

  • डबदाबा धबधबा – जव्हार भागातील सर्वात सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण. अतिशय उंचीवरून कोसळणारा हा धबधबा पांढऱ्याशुभ्र पाण्यामुळे अत्यंत आकर्षक दिसतो. आजूबाजूचा परिसर घनदाट अरण्याने व्यापला आहे. अजून हा भाग मानवस्पर्श विरहित आहे. त्यामुळे चमचमते पाणी अत्यंत स्वच्छ आहे.
  • ताम्हिणी घाट धबधबा – या धबधब्यामुळे पुण्याचा प्रवास अत्यंत नेत्रसुखद आणि सुंदर होतो. हिरवेगार डोंगर.. घनदाट अरण्य आणि संतत कोसळणारा जलप्रपात संपूर्ण परिसर स्वप्नवत वाटतो. या धबधब्याव्यतिरिक्त थोड्या अंतरावर असलेल्या कांसाई धबधबा आणि उष्ण पाण्याचे झरेही आनंदानुभव देतात.
  • ठोसेघर धबधबा – सातारा जिल्ह्यातील ठोसेघर या छोट्या गावातील अरण्यातील अनेक लहान मोठ्या धबधब्यांनी हा धबधबा तयार झाला आहे. यातील लहान धबधब्याची उंची 15 ते 30 मीटर इतकी नगण्य आहे तर सर्वात मोठ्या धबधब्याची उंची सुमारे 500 मीटर आहे. हे धबधबे राम आणि लक्ष्मण धबधबे म्हणून ओळखले जातात. येथे आजूबाजूला खाण्याची, जेवणाची सोयही उत्तम आहे.
  • नांगरतास धबधबा – आम्बोलीपासून दहा किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. 10 फूट उंचीवरून खोल ओढ्यात कोसळणारा धबधबा एक वेगळाच ध्वनी निर्माण करतो. यातील गूढता मनास मोहवते.
  • अंब्रेला धबधबा – प्रचंड पाउस झाल्यानंतर उंच खडकावरून पाणी अशाप्रकारे खाली पडते की त्याचा आकार एखाद्या छत्रीप्रमाणे दिसतो. भंडारदरा येथील हे सर्वात चैतन्यदायी ठिकाण आहे. वीजनिर्मितीचा हा प्रमुख स्त्रोत आहे.
  • भांबवली वजराई धबधबा – हा धबधबा 1840 फूट उंचीवरून तीन टप्प्यात कोसळतो. हा हिंदुस्थानातील सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जातो. धबधब्यात येणारे पाणी उरमोडी नदीतून येते. याच्यापासून पाच किलोमीटर अंतरावर कास पठार तर दोन किलोमीटर अंतरावर भांबवली पठार आहे. हा बाराही महिने वाहणारा धबधबा आहे.
  • पाबल नाला धबधबा – पाबल येथील हा धबधबा अतिभव्य आहे. खाली पडणाऱ्या पाण्यामुळे तलाव तयार होतो. येथे तुम्ही पोहोण्याचा आनंद घेऊ शकता.
  • भिवपुरी धबधबा – कर्जत येथील हा धबधबा 20 फूट उंचीवरून खाली कोसळतो. वर्षभर कोसळणारा हा धबधबा आहे.
  • देवकुंड धबधबा – भिरा येथील हा धबधबा 55 मीटर उंचीवरून कोसळतो. खाली तयार होणाऱ्या तलावात तुम्ही पोहण्याचा आनंद घेऊ शकता.
  • मळवली धबधबा – पुण्याला येता जाता हे निसर्ग सौंदर्य नक्कीच अनुभवा. अत्यंत निर्जन आणि शांत ठिकाण आहे. एकांतवासासाठी अगदी योग्य ठिकाण आहे.