
अंतराळातील घडामोडींवर लक्ष ठेवणाऱया खगोलप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 19 नोव्हेंबर रोजी या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण बघायला मिळणार आहे. हे ग्रहण सकाळी 11.34 वाजता लागेल आणि सायंकाळी 5.33 वाजता सुटेल. यादरम्यान 97 टक्के चंद्र लाल रंगात दिसेल. 2001 ते 2100 मधील इतर कोणत्याही ग्रहणापेक्षा हे ग्रहण जास्त लांब असण्याची शक्यता आहे.
19 नोव्हेंबरच्या पहाटे पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्यामधून जाईल आणि नंतर त्या भागावर सावली पडेल. नासाने दिलेल्या माहितीनुसार पूर्ण चंद्रग्रहण हिंदुस्थानी वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता होईल. हे आंशिक चंद्रग्रहण असून ते 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी होणार असून जगभरातील लोक वेगवेगळ्या वेळी ते बघू शकतात. चंद्रग्रहण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया, उत्तर युरोप आणि अमेरिकेत दिसणार आहे. वर्षातील हे शेवटचे चंद्रग्रहण संपूर्ण हिंदुस्थानात कुठेही दिसणार नाही, पण आसाम आणि अरुणाचल प्रदेशात काही क्षणांसाठी ते दिसणार आहे. या खगोलीय घटनेदरम्यान चंद्र लाल रंगामध्ये दिसणार असल्याने खगोलप्रेमी या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. हवामानाच्या अनुषंगाने ग्रहणाच्या वेळी चंद्र क्षितिजावर दिसणाऱया कोणत्याही ठिकाणाहून ग्रहण दिसेल, अशी माहिती नासाने वेबसाईटच्या माध्यमातून दिली आहे.

























































