
सामना प्रतिनिधी । खेड
भारत संचार निगमच्या भोंगळ कारभाराविरोधात आज खेड शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. वारंवार खंडीत होणाऱ्या सेवेमुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी खेड कार्यालयातील अधिकाऱ्याना आहे म्हणून टाळे देत बीएसएनएलने आपल्या कारभारात सुधारणा केली नाही तर तेच टाळे कार्यालयाला लावण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
खेड तालुक्यात बीएसएनएल सेवेचे पुरते तीनतेरा वाजले आहेत. लॅण्डलाईन सह मोबाईल सेवा देखील वारंवार खंडीत होत आहे. सेवा खंडीत होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने मोबाईल तसेच लॅण्डलाईन धारकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. एखाद्या व्यवहाराबाबत संबधिताला संदेशाची देवाण-घेवाण वेळेत होत नसल्याने आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे.
बीएसएनएलची सेवा वारंवार खंडीत होण्याबाबत कार्यालयाशी संपर्क साधल्यास तेथील अधिकारी समर्पक उत्तरे देत नाहीत. उलटपक्षी संपर्क साधणाऱ्या ग्राहकांशीच उद्धटपणा केला जातो. या साऱ्याचा जाब विचारण्यासाठी खेड तालुका शिवसेनेच्या वतीने आज बीएसएनएलच्या खेड कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला. तालुका प्रमुख राजा बेलोसे शहर प्रमुख निकेतन पाटणे, पंचायत समितीचे उपसभापती एस के आंब्रे यांनी या धडक मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांना आहेर म्हणून टाळे देण्यात आले. येत्या काळात बीएसएनएलच्या कारभारात सुधारणा न झाल्यास तेच टाळे कार्यालयाला ठोकण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. या मोर्चात शिवसैनिक मोठ्य़ा संख्येने सहभागी झाले होते.





























































