मुंबईत आणखी 1600 कॅमेऱ्यांचे जाळे, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

देशातील प्रमुख शहरांत सुरक्षेच्या दृष्टीने केंद्रीय गृह विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबईसह अन्य शहरांत आणखी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत एकट्या मुंबईमध्ये आणखी 1600 कॅमेऱ्यांचे जाळे पसरणार असून त्यात चेहरा ओळखणाऱ्या 125 कॅमेऱयांचा समावेश असणार आहे.

केंद्रीय गृह विभाग ‘सुरक्षित शहर योजने’साठी निर्भया निधी उपलब्ध करून देणार आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ही योजना हाती घेण्यात आली असून मुंबईव्यतिरिक्त दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद आणि लखनौ या शहरांमध्ये ‘सुरक्षित शहर योजने’अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबई पोलीस शहरात 125 चेहरा ओळखणारे कॅमेरे, पोलीस वाहनांवर 100 पॅनोरॅमिक कॅमेरे, 100 ऍटोमॅटिक नंबर प्लेट ओळखणारे कॅमेरे अशा प्रकारे 1600 कॅमेरे शहरात लावण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही बसविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार 60/40 असा खर्च करणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते. या योजनेअंतर्गत गृह खाते 252 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात होणार असल्याचे समजते. कॅमेऱ्यांव्यतिरिक्त आणखीही काही उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

ऑनलाइन गुह्यांपासून वाचविण्यासाठी
इंटरनेटच्या जमान्यात महिलांच्या संबंधित ऑनलाइन गुह्यांचे प्रमाण मोठय़ा संख्येने वाढले आहेत. ऑनलाइन गुह्यांपासून महिलांचे सरंक्षण करण्याच्या दृष्टीनेसुद्धा विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. महिलांची ऑनलाइन गुह्यांपासून सुरक्षा करण्यासाठी मोहीम राबविण्यात येईल. तसेच टॅक्सी, रिक्षा, इमारतींमधील टॉयलेट, महिलांचे काही हॉस्टेल्स येथे क्यूआर कोड/रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिंफिकेशन बसविण्यात येणार असल्याचेदेखील सांगण्यात आले.