जमिनीच्या तुलनेत मोबदला अधिक दिला, प्रशासनाच्या कारभाराचा ‘लातूर पॅटर्न’

96

सामना प्रतिनिधी, लातूर

विविध भूसंपादनाच्या प्रकरणामध्ये शेतकरी आपले क्षेत्र कमी लागले या किंवा इतर कारणांसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवताना सर्वांनी पाहिलेले आहे. मात्र बुधोडा येथील एक शेतकरी माझी जमीन कमी संपादित झालेली आहे, मला अधिक मोबदला देऊ नका या कारणासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवीत आहे. ९ आर जमीन असताना प्रशासन त्यांना १३ आरचे पैसे देण्यास तयार असल्याचा नवीन ‘लातूर पॅटर्न‘ पाहण्यास मिळत आहे.

औसा तालुक्यातील मौजे बुधोडा येथील शेतकरी शिवाजी धोंडीराम कदम यांची ही कहाणी आहे. राष्ट्रीय महामार्ग ३६१ वरील मौजे बुधोडा शिवारातील सर्व्हे नंबर ४९ ब २ मधील ९ आर जमीन ही त्यांच्या नावावर आहे. औसा येथील उप अधिक्षक मोजणी भूमी अभिलेख यांनी त्यांच्या नावावर थेट १३ आर जमीन नावावर दाखवलेली आहे. प्रत्यक्षात शिवाजी कदम यांची केवळ ९ आर जमीन आहे. त्यामुळे त्यांनी उपविभागीय अधिकारी औसा, जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे लेखी निवेदने दिली. ९ नोव्हेंबर २०१७ पासून त्यांनी या संदर्भात प्रशासन स्तरावर पाठपुरावा केला आहे, परंतु गेंड्याची कातडी पांघरलेले प्रशासन काही हालत नाही, असा अनुभव त्यांना येत आहे.

माझी जमीन ९ आर आहे, मला १३ आर जमिनीचे पैसे नकोत ही ठाम भूमिका शिवाजी धोंडीराम कदम यांनी घेतलेली आहे. विशेष म्हणजे ते सेवानिवृत्त अव्वल कारकून आहेत. परंतु मागील कांही महिन्यांपासून त्यांना महसूल प्रशासनाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. संपादित जमिनीचा मोजणी अहवाल चुकीचा दिला जात आहे, त्यामुळे मोजणी अहवाल चुकीचा देणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे वेळोवेळी केलेली आहे. परंतु प्रशासन मात्र त्यांना १३ आरचेच पैसे घ्या की, तुमचे काय जात आहे असा उलटा सवाल करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या