परभणी जिल्ह्यात 14 ठिकाणी नाकाबंदी; एक हजार 538 जणांची घुसखोरी

634

पुणे, मुंबई, संभाजीनगर तसेच इतर शहरांमधून तब्बल 1 हजार 538 लोकांनी अवैधपणे परभणी जिल्ह्यात घुसखोरी केली आहे. या सर्वांना शोधून पोलिसांनी होम क्वारंटाईन केले आहे. तसेच पुढील काळात कुठल्याही व्यक्तीने घुसखोरी करू नये म्हणून जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या 83 गावांमध्ये पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आणि गावातील प्रमुख व्यक्तींचे पथक तयार करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यात 14 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. तरीदेखील पुणे, मुंबई, संभाजीनगर तसेच इतर शहरांमधून तब्बल 1 हजार 538 लोकांनी गैरमार्गाने जिल्ह्यात घुसखोरी केली आहे.

परभणी जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नव्हता. मात्र, गेल्या आठवड्यात पुण्याहून चोरट्या मार्गाने आलेल्या एका तरुणाची कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आली. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले. पोलीस प्रशासनाने बंदोबस्त लावूनही मोठ्या प्रमाणात अन्य शहरातून घुसखोरी सुरूच आहे. गेल्या काही दिवसात परभणी जिल्ह्यातील 14 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. असे असले तरी चोरट्या मार्गाने तसेच नाक्यांवर पोलिसांच्या गैरहजेरीत जिल्ह्याच्या सीमा ओलांडून येणाऱ्यांची संख्या आतापर्यंत 1 हजार 538 एवढी झाली आहे. या सर्वांना पोलिसांनी शोधून काढले असून त्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यावर आरोग्य पथक देखरेख ठेवत आहे. यापुढे घुसखोरांना आळा घालण्यासाठी पोलीस दलाने परभणी जिल्ह्यातील अन्य जिल्ह्यांच्या सीमा असलेल्या 83 गावांवर विशेष लक्ष ठेवले आहे. या गावांच्या हद्दीतून परभणी जिल्ह्यात कोणीही प्रवेश करू नये, यासाठी पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष आणि गावातील काही लोकांना एकत्र करून त्यांचे पथक तयार केले आहे. प्रत्येक दोन गावांमध्ये एक पोलीस कर्मचारीही पेट्रोलिंग करणार आहे. पोलीस या पथकाच्या माध्यमातून घुसखोरांना रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्ह्यातील 14 नाकेबंदी करण्यात आलेल्या ठिकाणांवरही पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

पुण्यातून येणाऱ्यांची संख्या जास्त
रोजगार किंवा शिक्षणानिमित्त परभणीतून लाखोजण मोठ्या शहरात गेले आहेत. त्यापैकी बहुतांश लोक लॉकडाऊन जाहीर होताच किंवा त्यापूर्वीच परभणी जिल्ह्यात परतले आहेत. मात्र, तरीही पुणे, मुंबई, संभाजीनगर आणि इतर जिल्ह्यात अडकून पडलेले नागरिक आता परभणीत परत येण्यासाठी धडपडत आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या पुणे येथून परभणीत येणाऱ्यांची आहे. पुण्यातून 322 लोकांनी गैरमार्गाने परभणीत प्रवेश केला आहे. त्यापाठोपाठ संभाजीनगर येथून 174, बीडमधून 162, मुंबईतून 50 तर उर्वरित लोक अन्य जिल्ह्यातून गैरमार्गाने दाखल झाले आहेत. या सर्वांना ताब्यात घेऊन होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या