आता उपांत्यपूर्व फेरीची किक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मॉस्को

रशियात सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपच्या बाद फेरीला सुरुवात झाली असून मंगळवारी मध्यरात्री अंतिम १६ संघांच्या लढती संपल्या. आता ६ जुलैपासून उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींना सुरुवात होणार आहे. यावेळी उरुग्वेसमोर फ्रान्सचे तर ब्राझीलसमोर बेल्जियमचे आव्हान असणार आहे. तसेच रशिया – क्रोएशिया आणि इंग्लंड – स्वीडन यांच्यामध्ये खडाजंगी रंगणार आहे.

उपांत्यपूर्व फेरीत कोण कोणाला भिडणार
उरुग्वे – फ्रान्स, ६ जुलै
ब्राझील – बेल्जियम, ६ जुलै
रशिया – क्रोएशिया, ७ जुलै
इंग्लंड – स्वीडन, ७ जुलै

युरोपची दादागिरी
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अंतिम आठमध्ये प्रवेश केलेल्या संघांपैकी सहा संघ युरोप खंडातील आहेत. त्यामुळे आतापर्यंत तरी या खंडातील देशांचीच दादागिरी दिसून आली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ब्राझील व उरुग्वे या दक्षिण अमेरिकन खंडातील देश वगळता एकाही खंडातील देशाला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करता आलेला नाही. फ्रान्स, इंग्लंड, रशिया, क्रोएशिया, बेल्जियम, स्वीडन हे अंतिम आठ फेरीपर्यंत पोहचलेले सर्व देश युरोप खंडातील आहेत.

चारच जगज्जेते उरले
रशियात सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये आता फक्त ब्राझील, उरुग्वे, इंग्लंड व फ्रान्स हे चारच जगज्जेते उरले आहेत. ब्राझीलने पाच वेळा, उरुग्वेने दोन वेळा आणि फ्रान्स व इंग्लंड यांनी प्रत्येकी एक वेळा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान संपादन केलाय.

नव्या चॅम्पियनची शक्यता
यंदा रशियात फुटबॉलला नवा चॅम्पियन मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्रोएशिया, बेल्जियम, स्वीडन व रशिया या देशांनी अद्याप एकदाही वर्ल्ड कप जिंकलेला नाही. यांच्यापैकी एकाने जरी जगज्जेते पदाला गवसणी घातली तर फुटबॉल विश्वाला नवा जेता लाभेल यात शंका नाही.