
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी घनकचरा व्यवस्थापन केंद्रात बुधवारी कचऱयाचा डोंगर इमारतीवर कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घनेत कचऱयाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 8 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर एकाचा शोध अद्यापही सुरू आहे.
‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर हजारो टन कचऱयाचा डोंगर अचानक कोसळल्याने दुमजली इमारत क्षणार्धात कोसळली. इमारतीला हजारो टन कचऱयाच्या मलब्याचा विळखा पडला. या दुर्घटनेत इमारतीमध्ये 23 कर्मचारी अडकल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी पाच जण स्वतः बाहेर पडले, तर बचाव पथकांनी एक महिलेसह सहा जणांना सुखरूप बाहेर काढले. उर्वरित 9 जणांना काढण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. तब्बल 80 तासांच्या प्रयत्नानंतर प्रशासनाने या बचाव मोहिमेतून 8 जणांचे मृतदेह बाहेर काढले. तर एकाचा अजूनही शोध सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दोषींना सोडणार नाही – सुनेत्रा पवार
दुर्घटनेच्या कारणांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल. जे जबाबदार असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. दोषींना सोडणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोध व बचावकार्याची पाहणी केली.
मृतांच्या कुटुंबीयांना 40 लाखांची मदत
मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून 10 लाख, राज्य सरकारकडून 5 लाख आणि संबंधित अँथोनी कंपनीकडून 25 लाख अशी प्रत्येकी एकूण 40 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले.


























































