मोस्ट वाँटेड नक्षलवादी कमांडर चेलुरी नारायण राव 8 सहकाऱ्यांसह पोलिसांना शरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 36 वर्षांपासून भूमिगत असलेला मोस्ट वाँटेड नक्षलवादी कमांडर चेलुरी नारायण राव उर्फ सुरेश अखेर पोलिसांना शरण आला आहे. राव याने आपल्या आठ सहकाऱ्यांसह आंध्र प्रदेशचे पोलीस महासंचालक हरीश कुमार गुप्ता यांच्यासमोर शरणागती पत्करली. राव हा आंध्र प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या मोठ्या नक्षलवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड होता. माजी आमदार किदरी सर्वेश्वर राव आणि माजी आमदार सिवेरी सोमेश्वर राव यांच्या हत्येत रावचा मुख्य सहभाग होता.

चेलुरी नारायण राव हा 1990 मध्ये तो नक्षलवादी चळवळीत सामील झाला होता. तो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या केंद्रीय समितीचा सदस्य आणि आंध्र-ओडिशा बॉर्डर स्पेशल झोनल कमिटीचा (AOBSZC) सचिव होता. तो माओवादी चळवळीतील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक मानला जात असे. राव याने पोलीस दलांवरील अनेक हल्ले आणि चकमकींचे नेतृत्व केले होते. 36 वर्षे भूमिगत राहिल्यानंतर अखेर तो पोलिसांना शरण आला आहे. नारायण राव सोबतच प्लाटून कमांडर आणि एरिया कमिटी मेंबर्सनीही शरणागती पत्करली आहे. पोलिसांनी या नक्षलवाद्यांकडून 19 शस्त्रे जप्त केली आहेत

आंध्र प्रदेश सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणानुसार, रावला 25 लाख रुपयांचे अनुदान मिळेल. इतर कार्यकर्त्यांना 1 लाख ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान बक्षिसाची रक्कम मिळेल. पोलीस महासंचालकांनी आत्मसमर्पण केलेल्या या नऊही सदस्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांची तातडीची मदत रक्कम सुपूर्द केली.