डाकू पिंप्री येथे नदीपात्रातील खड्डयात पडून माय-लेकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पाथरी

तालुक्यातील डाकूपिंप्री येथील गोदावरी नदीपात्रातील खड्डयात बुडुन एका सहा वर्षीय चिमुल्यासह मातेचा बळी गेल्याने डाकूपिंप्री गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शोभा सर्जेराव रुमाले (२७) आणि गोटू रुमाले (६) अशी मृतांची नावे आहेत.

शोभा या मंगळवार ५ जून रोजी दुपारी १ वाजता गोदावरी नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत गोटूही सोबत होता. शोभा कपडे धूत असतांनाच गोटू कपडे काढून पाण्यात उतरला. दरम्यान,वाळू तस्कर गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा करत असल्याने पात्रात मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यातच मंगळवारी जोरदार पाऊस पडल्याने या खड्डयांमध्ये पाणी साचले होते. त्याचवेळी गोटू फिरता फिरता या खड्डयात पडला व तो बुडू लागला. हा प्रकार शोभा यांच्या लक्षात येताच त्याला वाचविण्यासाठी त्यांनी धाव घेतली. मात्र त्यांनाही पोहता येत नसल्याने त्यांचाही खड्डयात पडून दुर्दैवी अंत झाला. अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलीस अधिक तपास करीत आहेत.