दारू पिऊन मारहाण करणाऱ्या मुलाची आईनेच केली हत्या; हातकणंगलेतील घटना

520

दारू पिऊन नेहमी शिविगाळ तसेच मारहाण करणाऱ्या दारुड्या मुलाच्या डोक्यात दगडी खलबत्ता घालून आईनेच मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील तीन विहीर परिसरातील विवेकानंद नगर येथे घडली. रवी शंकर तेलसिंगे ( वय 38) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी हत्या करणाऱ्या लक्ष्मीला ताब्यात घेतले आहे.

दारूच्या आहारी गेलेला रवी दररोज दारू पिऊन शिवीगाळ करून आईला मारहाण करीत होता. गेल्या दोन महिन्यात त्याचा त्रास जास्तच वाढला होता. दररोजच्या त्रासाला कंटाळून सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रागाच्या भरात आईने घरातीलच दगडी खलबत्ता मुलाच्या डोक्यात मारला. त्यात गंभीर जखमी झालेल्या रवीला शेजाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान पहाटे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून रवीची आई लक्ष्मी हिला ताब्यात घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या