
सामना प्रतिनिधी। हदगाव
हदगांव तळणी रोडवरील कोळी या गावाजवळ झालेल्या दुचाकींच्या अपघातात दोन्ही दुचाकींचे चालक जागीच ठार झाले आहेत. मानेजी गंगाराम सुर्यवंशी (३२) आणि ऊबेद शे. युनूस (२५) अशी मृतांची नावे आहेत.
मानेजी हा नाव्ही समाजातील असून दुचाकीवरुन निवळा गावात जाऊन तो कटींगचे काम करायचा. त्याच्यावरच त्याच्या कुटुंबाची गुजराण व्हायची. बुधवारी सकाळीही सहा वाजताच तो घरून निघाला होता. चार पैसे कमावून तो घराकडे परतत होता. त्याचवेळी निवळा येथील प्रभाकर कोकाटे यांनी त्याच्याकडे लिफ्ट मागितली. ते दोघे दोन किलोमीटर गेले असतील एवढ्यात समोरुन तळणी येथील ऊबेद हा तरुण वेगाने दुचाकीवरुन येत होता. अचानक त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दोन्ही दुचाकींची धडक झाली. या अपघातात ऊबेद व मानेजी हे जागीच ठार झाले. तर प्रभाकर कोकाटे व उबेदच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेला त्याचा चुलत भाऊ यांनाही जबर मार लागला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
































































