मोटरमनच्या प्रसंगावधानाने तरुणाचे प्राण वाचले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पनवेल

आत्महत्येचा प्रयत्न करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचे प्राण मध्य रेल्वेच्या मोटरमनने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे बचावले आहेत. ताशी 80 कि.मी.च्या वेगाने चाललेल्या पनवेल लोकलसमोर अचानक ट्रकवर एका 18 वर्षीय तरुणाला पाहून मोटरमनने ब्रेक दाबले. तसेच स्थानिकांच्या मदतीने या तरुणाची समजूत काढून त्यांना दूर नेले. वाशी ते मानखुर्द स्थानकांदरम्यान शनिवारी सकाळी हा प्रसंग घडला.

मध्य रेल्वेचे मोटरमन नरेंद्र तळेकर हे पनवेल लोकलवर डय़ुटीवर तैनात होते. सकाळी 10.49 वाजता ही गाडी सुटली आणि वाशी ते मानखुर्ददरम्यान आली असता तळेकर यांना एक तरुण रुळावर बसल्याचे दिसले. हे पाहताच मोटरमन तळेकर यांनी त्वरित गाडीमधील आपत्कालीन ब्रेक दाबून गाडी थांबवली. लोकलमधून उतरून त्यांनी आत्महत्येसाठी आलेल्या त्या तरुणाशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तो बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता. स्थानिकांनीही ही घटना पाहताच तेही तरुणाची समजूत काढण्यासाठी पुढे आले. दहा मिनिटे समजूत काढल्यानंतर ही लोकल पुढे रवाना झाली. मोटरमन नरेंद्र तळेकर यांच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.