माऊंट मनस्लूवर कोल्हापूरच्या कस्तुरीने फडकवला तिरंगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील अष्टहजारी शिखरांपैकी आठव्या क्रमांकावर असलेल्या माऊंट मनस्लू शिखरावर कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकर हिने तिरंगा फडकवला आहे. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत 8 हजार 163 मीटर उंचीचे शिखर सर करणारी ती कोल्हापूरची युवा गिर्यारोहक ठरली आहे.

जगात माऊंट एव्हरेस्टसह एकूण 14 अष्टहजारी शिखरे आहेत. अष्टहजारी शिखर म्हणजे ज्या शिखराची उंची 8 हजार मीटर आहे. माऊंट मनस्लू हे आठव्या क्रमांकाचे शिखर आहे. हाडे गोठवणारी थंडी, 60 ताशी किमी वेगाने वाहणारे वारे, हिमवर्षाव तसेच 1 ते 2 टक्के इतकेच हवेतील प्राणवायूचे प्रमाण अशी या अष्टहजारी शिखरांची आव्हाने असतात. कस्तुरी सावेकर 4 सप्टेंबरला माऊंट मनस्लू शिखर सर करण्यासाठी रवाना झाली. रोटेशननंतर 25 सप्टेंबरला तिने चढाईला सुरुवात केली. 28 सप्टेंबर रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास तिने मनस्लू शिखर गाठले.

कस्तुरीला लहानपणापासून ट्रेकिंगची आवड आहे. तिने सह्याद्रीचे 160 ट्रेक केले आहेत. करवीर हायकर्स ग्रुपमधून पदभ्रमंती आणि गिर्यारोहण करत कस्तुरीने तयारी सुरू केली. एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी तिने दोन वर्षे खडतर परिश्रम घेतले. मात्र कोरोनामुळे गेल्या वर्षी तिची एव्हरेस्ट मोहीम थांबवली. यंदाही अनेक अडचणींवर मात करत 14 मार्च रोजी ती एव्हरेस्टला रवाना झाली होती. पण चक्रीवादळामुळे एव्हरेस्टवर प्रचंड वारे आणि हिमवर्षावाला प्रारंभ झाला. सुरक्षिततेसाठी कस्तुरीसह तिच्या पथकाला कॅम्प चारवरून तीनवर व पुन्हा कॅम्प दोनवर खाली यावे लागले होते. त्यानंतर आता पुढील वर्षी पुन्हा एव्हरेस्ट सर करण्यासाठी ती सज्ज झाली असून तत्पूर्वी तिने माऊंट मनस्लूवर शिखर सर केले. कस्तुरीवर अभिनंदनाच वर्षाव होत आहे.