2020मध्ये तिकीटबारीवर भिडणारे तारे-तारका, ‘या’ चित्रपटांमध्ये होणार ‘क्लॅश’

873

2019 हे वर्षं बॉलिवूडसाठी तसं काही खास चांगलं नव्हतं. यंदा आलेल्या तमाम चित्रपटांपैकी अनेक चित्रपट तिकीटबारीवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. उरी, गली बॉय, कबीर सिंग असे काही अपवाद वगळता बॉक्स ऑफिसवर तसे फारशी कमाल दिसली नाही. पण, पुढील वर्षी मात्र तिकीटबारीवर तगडी स्पर्धा दिसणार आहे. कारण, अनेक सुपरस्टार अभिनेत्यांचे चित्रपट एकाच दिवशी किंवा एकाच आठवड्यात झळकणार आहेत. त्यामुळे ही स्पर्धा चांगलीच रंगणार आहे.

ही स्पर्धा 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. अजय देवगण अभिनित – ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी’ आणि दीपिका पदुकोण अभिनित- मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ हे एकाच दिवशी झळकणार आहेत. हे दोन्ही विषय जबरदस्त असल्याने या दोन्ही चित्रपटांविषयी प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

फेब्रुवारीत रंगणारी स्पर्धा नवोदितांमध्ये असेल. कारण व्हेलेंटाईन्स डेचा मुहूर्त साधून सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा ‘लव्ह आज कल 2’ तसंच दिशा पाटणी आणि आदित्य रॉय कपूरचा ‘मलंग’ एकाच दिवशी झळकतील. या स्पर्धेत ‘लव्ह आज कल 2’चं पारडं जड असावं असं प्रेक्षकांचा कल पाहता वाटत आहे. पुढची लढत वरुण धवनच्या ‘स्ट्रीट डान्सर’ आणि कंगना रणौतच्या ‘पंगा’मध्ये होणार आहे.

त्यानंतरच्या दोन लढती तर धमाल उडवून देतील अशी अपेक्षा आहे. यातल्या पहिल्या लढतीत विकी कौशलचा ‘भूत पार्ट वन’ आणि आयुषमान खुरानाचा ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ असणार आहेत. दोन्हीही अभिनेते कसलेले असल्याने नेमकं कुणाचं पारडं जड होतं, ते त्याची उत्कंठा वाढली आहे. तर दुसऱ्या लढतीत अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ आणि सलमान खानचा ‘राधे’ हे चित्रपट ईदच्या दिवशी एकमेकांसमोर येतील. हा सामना एकतर्फीही असू शकतो किंवा आणखीही वेगळं चित्र पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

2 ऑक्टोबर 2020 रोजी तर चौफेर युद्ध असेल. कारण त्याच दिवशी फरहान अख्तरचा ‘तूफान’, जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते 2’, विकी कौशलचा ‘सरदार ऊधम सिंग’ आणि टायगर श्रॉफचा ‘रॅम्बो’ असे चार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे ही लढत रंजक असणार यात शंका नाही. थोडक्यात पुढच्या वर्षी विषयांचं वैविध्य आणि कलाकारांचा अनुभव पाहता तिकीटबारीवर घमासान युद्ध रंगणार असं चित्र आहे.

आपली प्रतिक्रिया द्या