अमर सिंह यांचे सिंगापूर येथे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नेते, राज्यसभा खासदार अमरसिंह यांचे दीर्घ आजाराने आज सिंगापूर येथे निधन झाले ते 64 वर्षांचे होते. अमरसिंह किडनी विकाराने आजारी होते. सिंगापूर येथे मार्च महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, अमरसिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा आदी नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

2011 मध्ये अमरसिंह यांच्यावर किडनी ट्रान्सप्लँटची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालवत गेली. आज दुपारी सिंगापूर येथील रुग्णालयात निधन झाले. विशेष म्हणजे आज सकाळीच त्यांनी ट्विट वरून  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त अभिवादन केले होते.

मुलायम सिंह यांचे निकटवर्तीय

समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे अत्यंत विश्वासू, निकटवर्तीय अशी दिल्लीच्या राजकारणात अमरसिंह यांची ओळख होती. 1996 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभा खासदार झाले आणि सपाचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले. त्यानंतर 2002, 2008 आणि 2016 मध्ये सलग चारवेळा ते राज्यसभेचे खासदार बनले. 2010 मध्ये अखिलेश यादव यांच्याशी मतभेद झाले. त्यानंतर अमरसिंह सपातून बाहेर पडले. 2011 मध्ये राष्ट्रीय लोकमंच पक्षाची स्थापना केली. 2016 मध्ये अमरसिंह यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविली आणि ते सपाच्या पाठिंब्यावर निवडूनही आले. काही वर्षांपासून ते भाजपच्या जवळही आले होते.