वैचारीक उंची नसलेल्यांनी बोलू नये, अमोल कोल्हेंचा नितेश राणेंना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांच्यावर जहरी टीका केली होती. तसेच, एकेरी उल्लेख करत 2024 च्या निवडणुकीत आपटून टाकू, असे त्यांनी म्हटले होते. आमदार राणेंच्या या टिकेला खासदार कोल्हेंनीही जशास तसे प्रत्त्युत्तर दिले आहे.

इथे कोण निवडून येणार हे माझ्या मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि सगळे मतदार ठरवतील, तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे या आमदारांनी 400 किलोमीटर दूरवरुन येऊन माझ्या मतदारसंघातील नागरिकांना गृहीत धरू नये. हे आमदार महोदय त्यांच्या वडिलांच्या कर्तृत्वाच्या जीवावर ओळखले जातात. त्यांचं स्वत:चं कार्यकर्तृत्व काय? ज्यांची वैचारीक उंची नाही, त्यांनी बोलू नये अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी आमदार नितेश राणेंना फटकारले आहे.

पुढे अमोल कोल्हे नितेश राणेंना सवाल करत म्हणाले की. छत्रपती संभाजी राजेंचं कार्य घरघरात पोहोचवण्यासाठी या महाशयांनी आत्तापर्यंत काय केलं? त्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केले आहेत का? जर नसेल तर क्रियेवीन वाचाळता व्यर्थ, असे म्हणत कोल्हेंनी राणेंना टोला लगावला.

कला हे माझ्या उदरनिर्वाहाचं साधन आहे, माझ्या उत्पन्नाचा मार्ग कला आहे. मी माझ्या उत्पन्नाचे सर्व स्त्रोत जाहीरपणे सांगू शकतो. आमदार नितेश राणे हे त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत उजळमाथ्याने समाजासमोर सांगू शकतात का? असे आव्हानही अमोल कोल्हे यांनी राणेंना दिले.