‘मरणाऱ्यांना कोणी वाचवू शकणार नाही, वय झालं की…’, भाजप मंत्र्याचं धक्कादायक विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाचा प्रकोप सुरू असून गेल्या 24 तासांमध्ये 2 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद आणि 1 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये परिस्थिती बिकत होत असून मध्य प्रदेशमध्येही कोरोना रुग्णांचा आकडा 50 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. तसेच बुधवारी सर्वाधिक 51 लोकांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री प्रेम सिंह पटेल यांनी धक्कादायक विधान केले आहे.

शिवराज सरकारमध्ये पशुपालन मंत्री असणाऱ्या प्रेम सिंह पटेल यांनी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे तांडव कोणीच रोखू शकत नसल्याचे म्हटले आहे. मरणाऱ्यांना कोणी वाचवू शकणार नाही, वय झालं की मृत्यू होणारच, असे विधान त्यांनी केले आहे.

आम्ही प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये जाऊन कोरोनापासून वाचण्यासाठी लोकांना मास्क घालण्याचा, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा सल्ला देत आहोत. परंतू कोरोनामुळे लागोपाठ मृत्यू होत असून हे कोणीच रोखू शकणार नाही. कोणाला शंका असल्यास त्यांनी डॉक्टरांना जाऊन भेटावे. एका विशिष्ट वयानंतर सर्वांना मृत्यू गाठणारच, असे विधान प्रेम सिंह पटेल यांनी केले आहे.

प्रेम सिंह पटेल यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सरकारमधील मंत्र्याने असे बेजबाबदारपणाचे विधान करण्याऐवजी जीव वाचवण्यासाठी आरोग्यव्यवस्था कशी सुधारेल याकडे लक्ष द्यावे, असा टोला नेटकरी लगावत आहेत.

आकडे लपवल्याचा आरोप

मध्य प्रदेश सरकार कोरोनाचे आकडे लपवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर आरोग्यमंत्री प्रभुराम चौधरी यांनी स्पष्टीकरण देत हे आरोप फेटाळून लावले आहेत. काही मृत्यू संशयित असल्याने आकडे कमी-जास्त दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.