आंदोलन करू नये यासाठी पाच कोटींची ऑफर; खासदार नीलेश लंके यांचा गौप्यस्फोट 

‘मी हे आंदोलन करू नये यासाठी शेकडो लोकांचे मध्यस्थीसाठी मला फोन आले. पाच कोटी रुपये देतो, महिन्यालाही ‘पाकीट’ ठरवून देतो, अशी ऑफर देण्यात आली होती,’ असा गौप्यस्फोट खासदार नीलेश लंके यांनी केला. ‘जर हे लोक पाच कोटी रुपये देत असतील, तर हे पैसे कुठून आले?’ असा सवाल करीत, ‘वाईट मार्गाने पैसे कमावून मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे,’ असे लंके यांनी सांगितले.

स्थानिक गुन्हे शाखेमधील भ्रष्टाचाराविरोधात खासदार लंके यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हाभरातील नागरिकांनी लंके यांच्याकडे शेकडो तक्रारी केल्या. शिष्टमंडळाने दोनदा पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. मात्र, ती निष्फळ ठरली.

खासदार लंके म्हणाले, ‘आपण हाती घेतलेला विषय शेवटाला नेला तरच या खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. समाजाचे रक्षकच भक्षक झाले आहेत. सर्वसामान्यांना त्रास देण्याचे काम केले जात आहे. एका कर्मचाऱ्याला 10 ते 12 वर्षे एकाच ठिकाणी ठेवले जाते. गुन्हे शाखेतील निलंबित कर्मचारी 500 दिवस गैरहजर असताना त्यास पुन्हा हजर करून घेतले जाते. आर्थिक संबंधातून अशा अनेक गोष्टी केल्या जातात, त्याचे कागदोपत्री पुरावे आपल्याकडे आहेत,’ असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, ‘चुकीच्या पद्धतीने काम करणारे अधिकारी-कर्मचारी निलंबित झाले पाहिजेत. जिह्यातील अवैध व्यवसाय बंद झाले पाहिजेत, ही आमची मागणी आहे. याबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नाही,’ असे लंके यांनी सांगितले.

कर्डिले ठरवतो, कोणाला कोणते पोलीस ठाणे!

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी चुकीच्या पद्धतीने कामकाज केले आहे. याच शाखेचा कर्डिले नावाचा कर्मचारी कोणत्या पोलीस ठाण्यात कोणता कर्मचारी बसवायचा, हे ठरवतो. पोलीस अवैध व्यवसायांत पार्टनर असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले.

खासदार लंके यांची प्रकृती स्थिर

जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आज खासदार नीलेश लंके, त्यांच्यासोबत उपोषणास बसलेले माजी नगरसेवक योगिराज गाडे, अशोक रोहोकले यांच्या प्रकृतीची तपासणी केली. यावेळी लंके यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

‘नगर जिह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे वाढले असून, त्यातून हत्या घडण्याचे प्रमाण वाढले आहे. चंदनतस्करी, गुटखा, कॅफे, वाळू, आयपीएल सट्टा, पेट्रोल-डिझेलची तस्करी, जुगार, वेश्याव्यवसाय, बिंगो हे अवैध व्यवसाय कसे हाताळले जातात, याची आपल्याकडे सविस्तर माहिती आहे. बिंगो, आयपीएल सट्ट्यांमुळे अनेक तरुणांनी जीवन संपविले आहे, असे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.