
एसपी साहेब, तुम्ही आम्हाला सीएएचा विरोध केला म्हणून पाकिस्तानात जा, असे सुनावताय. तुमच्या वर्दीचा आदर ठेऊन आम्ही तुम्हाला सोडतोय. पण लक्षात ठेवा, तुमच्या बंदुकीतील गोळ्या संपतील; पण आम्ही आता हिंदुस्थान सोडून कुठेही जाणार नाही, अशा शब्दांत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करणार्यांना देश सोडून जा, असे बजावणारे मिरतचे पोलीस अधीक्षक अखिलेश नारायण सिंह यांना सुनावले.
शनिवारी सीएएविरोधात मिरतमध्ये आंदोलन करणार्या निदर्शकांनी पाकिस्तानात निघून जावे, असे वक्तव्य मिरतचे एसपी सिंह यांनी केले होते. त्यावर संतप्त प्रतिक्रिया देताना ओवेसी यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, एकदा इंग्रजांनी देशाची फाळणी केली, आता दुसरी फाळणी आम्ही होऊ देणार नाही. आम्ही देश सोडून कुठेही जाणार नाही.


























































