
स्वत:च्या जागी परीक्षेत तोतयांना बसवणाऱ्या खासदार नुसरत अडचणीत आल्या आहेत. त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता की त्यांनी तब्बल 13 परीक्षांमध्ये त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या 8 तोतयांना बसवले होते. या सगळ्या तोतयांना परीक्षा देण्यासाठी त्यांनी पैसे दिले होते. हा आचरटपणा केल्याबद्दल नुसरत यांना विद्यापीठाने काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
तमन्ना नुसरत या बांग्लादेशातील सत्ताधारी आवामी लीगच्या खासदार आहेत. त्या परीक्षा देत असल्याची माहिती एका खासगी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला मिळाली होती. त्यांची परीक्षा केंद्रावर मुलाखत घेण्यासाठी तो गेला होता. त्याला नुसरत यांच्या जागी भलतीच तरूणी बसल्याचं दिसताच त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याने या तरुणीचा व्हिडीओ काढला आणि व्हायरल केला. या व्हिडीओमुळे नुसरत यांचा भंडाफोड झाला.

2018 साली बांग्लादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या, या निवडणुकीत नुसरत जिंकून आल्या होत्या. जिंकून आल्यानंतर त्यांनी बांग्लादेश मुक्त विद्यापीठातून कला शाखेची पदवी मिळवण्यासाठी परीक्षा द्यायचं ठरवलं होतं. मात्र नुसरत यांचं डोकं कसं फिरलं हे ठावूक नाही मात्र त्यांनी अभ्यास न करता आणि परीक्षा न देता पदवी मिळवण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या 8 तरूणींची निड केली आणि त्यांना विविध परीक्षांमध्ये आपल्याजागी म्हणजेच नुसरत यांच्याऐवजी पैश्यांच्या बदल्यात पेपर सोडवायला सांगितले. नुसरत यांनी गुन्हा केला असून याबद्दल त्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यात येत असल्याची घोषणा मुक्त विद्यापीठाचे सर्वेसर्वा मन्ना यांनी सांगितले. यापुढे नुसरत या विद्यापीठात कधीही प्रवेश घेऊ शकणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाविद्यालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की ज्या तरूणी नुसरत यांच्या जागी परीक्षा द्यायला यायच्या त्यांना पोलीस संरक्षण असायचे. नुसरत या प्रभावशाली घराण्यातील असल्याने त्यांच्याविरोधात कोणी बोलू शकत नव्हते. बांग्लादेशात कॉपी आणि पेपरफुटी ही आता फार विशेष बाब राहिलेली नाहीये. या कारणांमुळे तिथल्या अनेक परीक्षा रद्द झालेल्या आहेत.



























































