एमपीएससीच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)  29 जानेवारी, 30 जानेवारी, 5 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एमपीएससीकडून ही माहिती देण्यात आली आहे. गट ‘ब’ दर्जाच्या  पदांसाठी मुख्य परीक्षा होणार होत्या.

मुख्य परीक्षेआधी झालेल्या पूर्वपरीक्षेत आयोगाकडून उत्तरपत्रिका तपासताना चूक झाल्याचा दावा करत 86 विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आयोगाच्या चुकीमुळे मुख्य परीक्षा देण्याची संधी एक किंवा दोन गुणांनी हुकल्याचा या विद्यार्थ्यांचा दावा होता. उच्च न्यायालयाने या विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात परीक्षा देण्यास परवानगी देण्यात यावी असा निर्णय दिला होता. निर्णयानुसार अचानकपणे मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास मर्यादित प्रमाणात असलेल्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांमुळे परीक्षा घेणं शक्य होणार नाही असं म्हणत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

म्हाडाची परीक्षा 31 जानेवारीला

म्हाडाच्या भरती परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता 31 जानेवारीपासून ऑनलाइन सुरू होणार आहेत. 31 जानेवारी, 2, 3, 7, 8, 9 फेब्रुवारी या सहा दिवसांत परीक्षा घेण्यात येणार  आहे. 565 पदांसाठी ऑफलाइन होणारी परीक्षा आता ऑनलाइन होणार आहे.