गोरेगावमधील वाहतूककोंडी फुटणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईच्या पश्चिम उपनगरच्या वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण असणाऱया गोरेगावच्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा राममंदिर ते रीलिफ रोडपर्यंत पालिका विस्तार करणार आहे. 209 कोटींवर खर्च करून करण्यात येणाऱया या कामामध्ये पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगाव (प.) व लिंक रोड शॉर्टकटने जोडण्यात येणार आहेत. यामुळे गोरेगावमधील वाहतूककोंडी लवकरच फुटणार आहे.

शिवसेनेच्या पाठपुराव्यातून झालेला गोरेगाव येथील मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपूल पश्चिम द्रुतगतीमार्ग ते एस. व्ही. रोडपर्यंत वाहतुकीसाठी अलीकडेच खुला करण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे एस. व्ही. रोड जंक्शनवरील होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी राममंदिर रोड ते रीलिफ रोडपर्यंत विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. यामुळे एस. व्ही. रोडवरील वाहतूककोंडी फुटणार आहे. या पार्श्वभूमीवर या पुलाच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला असून हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीत मांडण्यात येणार आहे.

209 कोटींचा खर्च,दोन वर्षांत काम पूर्ण होणार
– पालिकेने या पूल विस्तारीकरणाचे कंत्राटकाम मे.एमपीएल -ग्यान (संयुक्त भागीदार) या कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी कंत्राटदाराला 209 कोटी 64 लाख 50 हजार 804 रुपये देण्यात येणार आहेत.
– या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर कंत्राटदाराला पालिकेकडून कार्यादेश प्राप्त होणार असून त्याने आगामी 2 वर्षांत पुलाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण करायचे आहे.
– या कामासाठी नियुक्त तांत्रिक सल्लागार मे. टीपीएफ इंजिनीअरिंग प्रा. लि. यांना सल्ल्यापोटी 209 कोटींपैकी 1.94 कोटी रुपये तर अधिक फेरतपासणी सल्लागार मे. कंस्ट्रुमा कन्सल्टन्सी प्रा. लि. यांना 58.38 लाख रुपये देण्यात येणार आहेत.
– या विस्तारित पुलाची लांबी 840 मीटर, पुलाची रुंदी -15.50 मीटर,पाया आरसीसी पाईल्स अशा स्वरूपाचे असणार आहे.