
टीव्ही आणि मोठय़ा पडद्यावरील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिजीत खांडकेकर. दररोज शूटिंगवरून आल्यावर रात्रीचे दहा किंवा अकरा वाजले तरी न चुकता अभिजीत ‘जिम’मध्ये असतो.
अभिजीतला सकाळी उठल्यावर चहा किंवा ब्लॅक कॉफी लागते. सकाळी शूटिंगला जाण्याची घाई असली की, कॉफीचा मग घेऊन गाडीतून प्रवास करताना तो दिसतो. अभिजीतला इन्स्टाग्रामवर फोलो करणाऱ्यांना तर ही गोष्ट माहीत असेल. त्याचा ब्रेकफास्ट म्हणजे जास्तीत जास्त प्रोटिन असलेले पदार्थ… अंडी, फळे किंवा ओट्स.
दिवसाच्या पहिल्या अर्ध्या भागात तुम्ही हवे ते खाऊ शकता. कारण त्या वेळी तुमचे शरीर सतत काही ना काहीतरी काम करण्यात व्यस्त असते. त्यामुळे पचन सोपे होते. त्यामुळे अभिजीत त्यादरम्यान शेंगदाणे, ड्राय फ्रूट्स अशा गोष्टी खातो. दुपारी दीड वाजता तो लंच करतो, ज्यात घरच्या डब्याला पहिली पसंती. घरी असताना चपाती, भाजी किंवा नॉनव्हेज जेवणाचा समावेश असतो. त्याचे रात्रीचे जेवण हे सात ते आठच्या मध्येच होते. त्याचे म्हणणे आहे की, त्यामुळे अन्न पचायला जास्त वेळ मिळतो. जेवणातील योग्य प्रोटिन, व्हिटॅमिन्स वगैरेंचा उत्तम वापर होतो. जर कधी रात्रीची भूक लागली तर तो प्रोटिन शेक पितो.
शक्यतो रोज शूटिंगवरून आल्यावर रात्रीचे दहा किंवा अकरा वाजता न चुकता तो जिम करतो. या गोष्टीचा तो कधी कंटाळा करत नाही, पण जिम केल्याने शारीरिक नव्हे, तर मानसिकदृष्टय़ाही शांतता लाभते, असे त्याचे म्हणणे आहे. दिवसभर जर काही अरबट-चरबट खाणे झाले तर व्यायाम केल्याने मनाला शांतता तर मिळतेच. शिवाय कॅलरीसुद्धा कमी होतात. शूटिंगमुळे त्याच्या डाएटमध्ये कधी अडथळा येत नाही. अगदी चुकून कधीतरी डाएटमध्ये खंड पडलाच तर तो संतुलन राखतो.
त्याने लॉकडाऊनच्या काळात कुकिंगचे बरेच प्रयोग केले. अगदी पोळीपासून ते भरलेले वांगे, पिझ्झा, कुकीस, कचोरी, पाणी पुरी हे सगळे पदार्थ त्याने बनवले. त्याला स्वयंपाकघरात मदत करायचा अजिबात त्रास वाटत नाही. भाज्या कापण्यापासून ते अगदी कणिक मळण्यापर्यंत त्याला सगळे येते. त्याने बनवलेली पनीर बटर, मसाल्याची भाजी त्याला स्वतःला व त्याच्या कुटुंबीयांना खूपच आवडते. अभिजीतला आईच्या हातची कढी, अळूची पातळ भाजी आणि इतर बरेच पदार्थ आवडतात. शाळा किंवा कॉलेजच्या दिवसांत जेव्हा आईच्या हातचे आयते जेवायला मिळायचे तेव्हा आपण अनेक भाज्यांना नाक मुरडतो आणि आता मात्र आईच्या हातच्या जेवणाची ओढ लागते, हे सांगायला तो विसरत नाही.
- अभिजीतला नॉनव्हेज खायला आवडते. सर्वात जास्त सी फूड आवडतात. त्याच्यासाठी हॉटेलमध्ये गेल्यावर गरमागरम सी फूड किंवा चिकन भाकरी खाण्याची मजाच वेगळी आहे. इटालियन क्यूसीन व जापनीस क्यूसीनसुद्धा खायला आवडते. त्याला सगळे ट्राय करून बघायला आवडते.
मृदा झरेकर,
म. ल. डहाणूकर कॉलेज






























































