माया जाधव, जयंत सावरकर यांना ‘मृदगंध’ जीवनगौरव! शुक्रवारी प्रभादेवी येथे पुरस्कारांचे वितरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या मृदगंध पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. लोककलाकार, लावणीसम्राज्ञी माया जाधव आणि ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना अनुक्रमे 2020 आणि 2021 या वर्षाकरिता ‘मृद्गंध’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कारांचे वितरण आणि लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह शुक्रवार, 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़मंदिरात पार पडणार आहे.

आपल्या कलेने राज्याला समृद्ध करणारे कलावंत तसेच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या वतीने ‘मृदगंध’ पुरस्कार प्रदान केला जातो. पुरस्कार सोहळ्याचे हे अकरावे वर्ष आहे. गतवर्षी कोरोनामुळे पुरस्कार सोहळा झाला नाही. त्यामुळे यंदा 2020 आणि 2021 या दोन्ही वर्षांच्या पुरस्कारमूर्तींना एकाच वेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाच्या पहिल्या पुष्पात राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्र्ााrय गायक महेश काळे यांचे सुमधुर गायन होणार आहे. दुसऱ्या पुष्पात सत्यपाल महाराज चिंचोळकर यांचे भजन रंगणार आहे. या कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका 25 आणि 26 नोव्हेंबरला रवींद्र नाटय़मंदिरात उपलब्ध होतील, अशी माहिती विठ्ठल उमप फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश उमप यांनी दिली.

2020 चे पुरस्कार विजेते ः माया जाधव (जीवनगौरव), प्रेमानंद गज्वी (साहित्यिक), प्रशांत दामले (अभिनेते), अशोक वायंगणकर (संगीत), रवींद्र भिलारी (सामाजिक), प्राजक्ता कोळी (नवोन्मेष प्रतिभा).

2021 चे पुरस्कार विजेते ः जयंत सावरकर (जीवनगौरव), डॉ. विजया वाड (साहित्यिक), आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे (सामाजिक), उत्तरा केळकर (संगीत), सत्यपाल महाराज चिंचोळकर (लोककला), ओम राऊत (नवोन्मेष प्रतिभा).