
लोणावळ्याच्या लायन्स पॉइंटवर उभे राहिले असता खाली जो कोकणचा प्रदेश दिसतो त्याला टायगर्स व्हॅली असे नाव आहे. या टायगर्स व्हॅलीमध्ये उभा असलेला छोटेखानी मृगगड भटक्यांना आजही खुणावत असतो. लोणावळ्याच्या लायन्स पॉइंटवरून हे दुर्गरत्न ओळखायची खूण म्हणजे कोकणातून घाटावर आलेला मोराडीचा सुळका होय.
लोणावळा-खंडाळा ही सर्वपरिचित ठिकाणे, परंतु या लोणावळा खंडाळ्याच्या कुशीमध्ये असेच एक अपरिचित दुर्गरत्न ‘किल्ले मृगगड ऊर्फ भेलीवचा किल्ला लपलेला आहे. बऱयाचदा लोणावळा-खंडाळा परिसरातील किल्ले भटकायचे झाले की, भटक्यांची पावले वळतात ती लोहगड, विसापूर, राजमाची या प्रसिद्ध किल्ल्यांच्या वाटेवर. परंतु तुम्हाला जर निसर्गाचे नवे रूप, निरव शांतता, सह्याद्रीचे उंचच उंच आणि बेलाग कडे, घाट आणि कोकण यांच्यामधली नैसर्गिक विविधता अनुभवयाची असेल तर थोडीशी आडवाट करून तुम्ही मृगगड किल्ल्याचा ट्रेक करू शकता. आठवडय़ाचा सगळा थकवा पळवून मृगगडाचा ट्रेक तुम्हाला नक्कीच सुखावू शकतो.
लोणावळ्याच्या लायन्स पॉइंटवर उभे राहिले असता खाली जो कोकणचा प्रदेश दिसतो त्याला टायगर्स व्हॅली असे नाव आहे. या टायगर्स व्हॅलीमध्ये उभा असलेला छोटेखानी मृगगड भटक्यांना आजही खुणावत असतो. लोणावळ्याच्या लायन्स पॉइंटवरून हे दुर्गरत्न ओळखायची खूण म्हणजे कोकणातून घाटावर आलेला मोराडीचा सुळका होय. या मोराडीच्या सुळक्याला स्वयंभू शिवलिंग असेदेखील म्हणतात. या मोराडीच्या सुळक्याच्या बरोबर पायथ्याला छोटासा तीन शिखरांचा डोंगर आहे. तो डोंगर म्हणजे मृगगड ऊर्फ भेलीवचा किल्ला.

मृगगड ऊर्फ भेलीवचा किल्ला हा पुणे आणि रायगड जिह्यांच्या सीमारेषेवर उभा आहे. मृगगड किल्ला जरी खंडाळ्याच्या कुशीत वसलेला असला तरी या किल्ल्यावर जाण्यासाठी खंडाळा घाट उतरून खोपोलीमार्गे खोपोली-पाली रस्त्यावर यावे लागते. स्वतःची बाईक किंवा कार असणे उत्तम पर्याय. तसेच खोपोली बस स्थानकावरून पाली गावाची एसटी किंवा सहा आसनी रिक्षांचा पर्याय आहे. या रस्त्यावरून मृगगडला जाताना अजून एका ऐतिहासिक ठिकाणी आपण जाऊ शकता ती म्हणजे ऐतिहासिक उंबरखिंड. ही खिंड वाटेत असल्यामुळे हा आपल्यासाठी नक्कीच बोनस ठरू शकतो. उंबरखिंड ते जांभूळपाडा अंतर साधारणतः 10 किमी आहे. तेथून पुढे पालीच्या 20 किलोमीटर अलीकडे जांभूळपाडा नावाचे गाव लागते.
या जांभूळपाडय़ाच्या कमानीमधून आत शिरल्यावर भेलीव गाव विचारावे. साधारणतः 15-20 मिनिटांत तुम्ही भेलीव या गावात येऊन पोहोचता आणि आपल्या समोर उभा असतो तो मृगगड आणि थोडीशी मान उंच करून बघितली की, दिसतो तो लोणावळ्याचा लायन्स पॉइंट’. उजव्या बाजूला अणघाई किल्ला साद घालत असतो, तर माथ्यावरून कोराईगड कोकणच्या परिसरावर पहारा देत उभा असलेला पाहायला मिळतो.
मृगगडाच्या पायथ्याचे गाव भेलीव आहे. भेलीव गावामध्ये गाडय़ा लावून आपण शाळेसमोरून जाणाऱया पायवाटेने मृगगडाच्या वाटेवर लागावे. एवढय़ात येथे एक व्यायामशाळा बांधलेली असून याच व्यायामशाळेच्या इमारतीच्या मळलेल्या मागच्या वाटेने मृगगडावर जाणारी वाट सुरू होते. या मळलेल्या वाटेवर सध्या दुर्गवीर प्रतिष्ठान या गड संवर्धन करणाऱया संस्थेने लोखंडी फलक आणि दिशादर्शक बाण केले असल्याने शक्यतो वाट कुठेही चुकत नाही. गडाच्या पूर्वखिंडीमध्ये पोहोचण्यासाठी साधारणतः एक तासाचा अवधी लागतो. या खिंडीमध्ये पोहोचायच्या आधी बऱयाच ढोरवाटादेखील लागतात, परंतु दिशादर्शक बाण सोडू नये. मृगगडाच्या पायथ्याचे जंगल अत्यंत घनदाट आहे.
याच वाटेत साधारणतः 20 ते 25 मिनिटे चालल्यानंतर एक मोठे उंबराचे झाड लागते. त्या झाडावर पांढऱया रंगाने जुनी खूण केली आहे. या झाडाच्या बाजूने एक पायवाट गडावर जाते. ती थेट आपल्याला घेऊन जाते मृगगडाच्या खिंडीत. ही खिंड म्हणजे नाळ आहे. अत्यंत खडी आणि दमछाक करणारी चढण चढल्यावर एक कातळटप्पा आपणांस दिसतो. या कातळटप्प्यामधेच सुबक पायऱया खोदल्या आहेत. या पायऱया आपणांस खिंडीमधूनदेखील दिसतात. तिकडे न जाता दरी उजवीकडे ठेवावी आणि कातळाला चिटकून जाणाऱया अरुंद वाटेने साधारणतः 15 ते 20 मीटर अंतर जावे. तेथे आपणांस अत्यंत सुबक खोदलेले लेणे बघावयास मिळेल. त्या लेण्यामध्ये नीट बघितले असता एक पाण्याचे टाकेदेखील बघावयास मिळेल.
लेणे बघून परत मागे फिरावे. कातळटप्यातील कोरीव पायऱया चढाव्यात आणि माथा गाठावा. माथ्यावर चढताना माथ्याच्या खालच्या टप्प्यावर तुम्हाला तटबंदीचे अवशेष बघायला मिळतील. तसेच गडाच्या दरवाजाचे जोते पाहायला मिळते. गडाचा विस्तार अत्यंत छोटा आहे असून मृगगड किल्ला पूर्व-पश्चिम असा पसरला आहे. गडावर चढून गेले असता मोराडीचा सुळका लक्ष वेधून घेतो. गडावर प्रवेश केला असता उजव्या हाताला गेल्यावर आपल्याला कडय़ाच्या काठाला असलेली महिषासुरमर्दिनीची आता भग्न झालेली घुमटी बघायला मिळते. येथे देवीची अत्यंत सुबक मूर्ती असून तिच्या डोक्यावर असलेली महिरप सुंदर दिसते.
तसेच या देवीच्या शेजारी आपल्याला हातामध्ये डमरू आणि त्रिशूळ घेतलेली भैरवाचीदेखील मूर्ती पाहायला मिळते. तसेच या दोन्ही मूर्तींच्या समोर शिवलिंगदेखील पाहायला मिळते. या गडदेवतेच्या घुमटीच्या समोर एक कर्पूरस्तंभदेखील आपल्याला पाहायला मिळतो. तसेच येथून जवळच गडावर असलेल्या वाडय़ाचे काही तळखडेदेखील पाहायला मिळतात. गडावर असलेल्या घुमटीच्या जवळच उजव्या बाजूला एक चौथरा आपल्याला पाहावयास मिळतो. त्याच्यामध्ये वेताळदेव स्थानापन्न असून त्याचे स्वतंत्र मंदिर आपल्याला पाहायला मिळते.
येथून पुढे गेले असता आपल्याला गडावरचे काही महत्त्वाचे अवशेषदेखील पाहायला मिळतात. यामध्ये आपल्याला दगडात खोदलेले उखळ, वाडय़ाचे तळखडे तसेच एक दगडी पाटादेखील या ठिकाणी पाहायला मिळतो. इथेच जवळच आपल्याला पाण्याची तीन टाकी पाहायला मिळतात. त्यातील एका पाण्याच्या टाक्याला आतमध्ये उतरण्यासाठी पायऱयादेखील बांधलेल्या पाहायला मिळतात. याशिवाय दोन टाक्यांच्या शेजारी तिसरे टाकेदेखील पाहायला मिळते. याच पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी पिण्यायोग्य आहे.
येथून आपण थोडेसे चढून उंच गेले असता आपल्याला सदरचे सुस्थितीमध्ये असलेले अवशेष पाहायला मिळतात. तसेच येथे एक दगडी भांडेदेखील आहे. गडाचा हा सगळ्यात उंच भाग असल्याने येथून आपल्याला फारच सुंदर नजारा पाहायला मिळतो. किल्यावरून पूर्वेस बघितल्यास सह्याद्रीची मुख्य रांग दिसते. थोडेसे वर बघितले असता मोराडीचा डोंगर, लोणावळ्याचा लायन्स पॉइंट आणि उजवीकडे दूरवर उंच दिसणारा कोरीगड तसेच पश्चिमेला आंबा नदीचे खोरे हा सर्व परिसर आपणांस दर्शन देत असतो.
इथून थोडेसे पुढे गेले असता आपल्याला दोन घरांची जोती पाहायला मिळतात. तसेच तिथून थोडे खाली गेले असता आपल्याला एक खांब टाकेदेखील पाहायला मिळते. येथून गडाच्या गडाच्या तिसऱया टप्प्यावर गेले असता आपल्याला तीन पाण्याची कोरडी टाकी पाहायला मिळतात. तसेच येथे आता एक ध्वजस्तंभदेखील उभारलेला आहे. किल्ल्याचे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे गडावर आपल्याला खूप पोस्ट होल्स सापडतात. या पोस्ट होल्सचा उपयोग हा लाकडी खांब रोवून तात्पुरते काही बांधकाम केले जात असावे. तसेच त्यांच्या भोवती आपल्याला पाणी वाहून जाण्यासाठी चर खोदलेलेदेखील आढळतात.
पश्चिमेस टोकावर गेले असता दूरवर सरसगड दर्शन देत असतो. किल्ल्यावर असंख्य पोस्ट होल्स आहेत. मृगगडाचे भौगोलिक स्थान बघितले असता हा किल्ला सर्व घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला असावा. तसेच उंबरखिंडीच्या ऐतिहासिक लढाईमध्येदेखील या किल्ल्याचा वापर झाला असावा असे दिसून येते. ‘सभासद बखरी’च्या एकूण सहा प्रती आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी ‘गड रास पहिली’ या प्रकरणात जी गडांची नावे येतात त्यामध्ये 60 क्रमांकावर मृगगड किल्ल्याचा उल्लेख हा ‘मृगंगड किंवा पिटगड’ असा येतो. बाकी गडाबाबत आजही जास्त इतिहास उपलब्ध नाही.
अशा प्रकारे गडफेरी पूर्ण करून छोटेखानी मृगगडावरून उतरून खाली येताना आजूबाजूचा परिसर न्याहाळल्यावर मनात नवे चैतन्य साठवत आपण भेलीव गावात यावे. आपल्या गाडय़ा काढाव्यात आणि परतीचा रस्ता पकडून पुढील किल्ल्याचे प्लॅन करत लोणावळामार्गे पुण्यात यावे.
>> अनुराग वैद्य
[email protected]


























































