‘महाराष्ट्र शाहीर’मध्ये मृण्मयी देशपांडे साकारणार लता मंगेशकर यांची भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे अजरामर गीत गाणारे शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट येणार आहे. केदार शिंदे दिग्दर्शित आणि अंकुश चौधरी अभिनित ‘महाराष्ट्र शाहीर’ 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची भूमिका अभिनेत्री मृण्मयी देशपांडे साकारणार असल्याचे समजते.

शाहीर साबळे यांचे स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान होते. लोककलेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्र आणि राज्याभिमान जागविण्याचे काम केले. या कार्याच्या माध्यमातून ते जाज्वल्य प्रतिभा असलेल्या अनेक माणसांच्या सान्निध्यात आले. ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर त्यापैकीच एक. पडद्यावर लता मंगेशकर यांची भूमिका मृण्मयी देशपांडे साकारणार असल्याची चर्चा आहे.

‘महाराष्ट्र शाहीर’ला अजय-अतुल यांचे संगीत, तर चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. शाहीरांच्या प्रमुख भूमिकेत अंकुश चौधरी आहे. चित्रपटाचे मोशन पोस्टर आणि शाहीर साबळे आणि त्यांच्या पत्नी भानुमती यांच्यावरील एक प्रेमगीत नुकतेच प्रकाशित करण्यात आले. गुरू ठाकूर यांनी ते लिहिले आहे.