महेंद्रसिंग धोनीची मैदानातील ‘एन्ट्री’ लांबली, डिसेंबरमध्ये सामना खेळण्याची शक्यता

677

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे क्रिकेटच्या मैदानावर उतरणे लांबले आहे. नोव्हेंबरमध्ये बांगलादेशविरोधात होणाऱ्या टी-20 सामन्यांसाठी धोनी उपलब्ध नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच पुढच्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही धोनी खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, डिसेंबर महिन्यात वेस्टइंडिजविरुद्ध होणाऱ्या टी -20 सामन्यात धोनी खेळण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत हिंदुस्थानचा पराभव झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे.

सुमारे दोन महिन्यांचा ब्रेक घेऊन धोनी सप्टेंबरमध्ये क्रिकेटच्या मैदानात उतरेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, धोनीने आपला ब्रेक अजून अडीच महिने वाढवल्याची माहिती मिळाली आहे. ब्रेक घेतल्यानंतर धोनी टेरिटोरिअल आर्मीत दाखल झाला होता. त्यामुळे त्याच्या निवृत्तीबाबतच्या अफवा पसरल्या होत्या. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टी-20 विश्वचषक- 2016 तील धोनीसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर धोनी पत्रकार परिषद घेऊन निवृत्तीची घोषणा करेल, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आपण हा फोटो सहजच अपलोड केला होता, असे सांगत विराटने चर्चांना पूर्णविराम दिला होता. धोनीने निवृत्तीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या