कर्णधार एम.एस. धोनीचा ‘टाय’चा अजब विक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दुबईमध्ये सुरू असलेल्या आशिया कपच्या सुपर फोर सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध नशिबाने एम.एस. धोनीला पुन्हा कर्णधारपदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली. धोनीचा कर्णधार म्हणून हा 200 वा एक दिवसीय सामना होता. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 252 धावा. त्यानंतर 253 धावांचा पाठलाग करताना हिंदुस्थानचा संघ 50 षटकात सर्व बाद 252 धावा करू शकला आणि सामना ‘टाय’ झाला. हा सामना टाय झाल्याने धोनीच्या नावावर एका अजब विक्रमाची नोंद झाली आहे. कर्णधार म्हणून पहिला आणि अखेरचा सामना ‘टाय’ झाल्याने धोनीच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली आहे.

धोनीने 23 डिसेंबर 2004 मध्ये बांगलादेश संघाविरुद्ध आपला पदार्पणाचा सामना खेळला होता. त्यानंतर आयसीसीच्या पहिल्या टी-20 विश्वचषकात हिंदुस्थानची धुरा धोनीच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. टी-20 विश्वचषकातील हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान हा धोनीचा कर्णधार म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 9 बाद 141 धावा केल्या होत्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 20 षटकात 7 बाद 141 धावा करू शकला आणि सामना टाय झाला. परंतु विश्वचषकाच्या नियमांनुसार सामन्याचा निकाल लागणे आवश्यक असल्याने बॉल आऊट घेण्यात आला आणि यात हिंदुस्थानने विजय मिळवला. यानंतर अंतिम सामन्यातही हिंदुस्थानने पाकिस्तानचा पराभव करत विश्वचषक जिंकला होता.

अझरुद्दीनचा विक्रम मोडला
200 व्या एक दिवसीय सामन्यात कर्णधार म्हणून खेळल्यानंतर धोनीने अझरुद्दीनचा विक्रम मोडीत काढला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध कर्णधार म्हणून खेळताना धोनीचे वय 37 वर्ष आणि 80 दिवस होते. या आधी सर्वाधिक वय असताना कर्णधार म्हणून खेळण्याचा विक्रम मोहम्मद अझरुद्दीनच्या नावावर होता. अझरुद्दीनने 1999 च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध कर्णधारपद सांभाळले होते. यावेळी त्याचे वय 36 वर्ष आणि 124 दिवस होते. जागतिक क्रिकेटमध्ये हा विक्रम नामीबियाच्या एलेक स्टीवर्ट याच्या नावावर आहे. 2003 च्या विश्वचषकात एलेकने 39 वर्ष 237 दिवसांचा असताना कर्णधारपद म्हणून जबाबदारी सांभाळली होती.