धोनीच्या 7 नंबरच्या जर्सी संदर्भात BCCI चा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार एमएस धोनीच्या क्रमांक 7 ची जर्सी संदर्भात BCCI नं मोठा निर्णय घेतला आहे. आता ही जर्सी कोणत्याही खेळाडूला उपलब्ध होणार नाही. कारण बीसीसीआयनं जर्सी क्रमांक 7 निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘हिंदुस्थानचे क्रिकेट बोर्डाकडून, धोनीच्या खेळातील योगदानाबद्दल त्याला सन्मान म्हणून, वर्ल्ड कप विजेत्या कर्णधारानं खेळलेला क्रमांक ‘निवृत्त’ करण्याचा निर्णय घेतला आहे’, अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसनं शुक्रवारी दिलेल्या वृत्तात दिली आहे.

एमएस धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो अजूनही फ्रँचायझी क्रिकेटमध्ये सक्रिय असून इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे.

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघानं धोनीच्या नेतृत्वाखाली पहिल्या T20 वर्ल्ड कप तसेच 2011 वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत ऐतिहासिक विजेतेपद मिळवले.

2017 मध्ये, BCCI नं मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरनं घातलेली 10 क्रमांकाची जर्सी अधिकृतपणे निवृत्त केली होती.

धोनी (7) आणि तेंडुलकर (10) यांनी वापरलेले नंबर आता पदार्पण करणाऱ्या खेळाडूंसह कोणालाही उपलब्ध नाहीत, असा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. आपला हा निर्णय त्यांनी राष्ट्रीय संघाला देखील कळवला आहे, असं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.