
सामना ऑनलाईन । मुंबई
महावितरणचा ऑनलाइन कारभार सध्या जोरात सुरू आहे. राज्यातील एकूण ग्राहकांपैकी 35 टक्क्यांहून अधिक म्हणजे तब्बल 50 लाख वीज ग्राहक महावितरणचे वीज बिल ऑनलाइनच्या माध्यमातून भरत आहेत. जवळपास 600 कोटी रुपयांची रक्कम थेट महावितरणच्या खात्यावर जात असल्याने वीज बिल कलेक्शनसाठी बँकांना द्याव्या लागणार्या लाखो रुपयांच्या कमिशनची बचत होत आहे.
महावितरणचे राज्यात 2 कोटी 40 लाख वीज ग्राहक असून त्यांना पुरवलेल्या विजेचे महिन्याला पाच हजार कोटी रुपये एवढे बीलिंग होते. आतापर्यंत ही वीज बिले महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्राबरोबरच जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी बँका, पतसंस्था आणि अन्य बँकांमध्ये भरून घेतली जात होती. त्यासाठी त्यांना 3-4 टक्के एवढे कमिशन दिले जाते. मात्र वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांना भल्यामोठय़ा रांगा लावाव्या लागतात. तसेच अनेक संस्था जमा झालेली बिलाची रक्कम वेळेत महावितरणकडे भरत नाहीत. त्याची दखल घेत महावितरणने ऑनलाइन वीज बिल भरण्याची आणि मोबाईल ऍपच्या मदतीने वीज बिल भरण्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे.
आरटीजीएसने 3000 कोटींचा भरणा
महावितरणकडे राज्यातील 20 हजार उच्च दाब औद्योगिक ग्राहक आहेत. त्यांचे महिन्याला तब्बल तीन हजार कोटी रुपये एवढे बिलिंग होते. ही रक्कम संबंधित ग्राहक आरटीजीएसच्या माध्यमातून महावितरणच्या खात्यावर भरणा केला जातो.



























































