वीज कनेक्शन देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी 50 हजारांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

फार्मास्युटिकल कंपनीला वीज कनेक्शन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरण कंपनीच्या एका इंजिनीयरला  दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. विजेअभावी कंपनीचे  नुकसान झाल्याप्रकरणी  हायकोर्टाने संबधित कर्मचाऱ्याला दणका देत  50 हजारांचा दंड ठोठावला तसेच तीन महिन्यांत हे पैसे भरण्याचे आदेश दिले.

मारीगोल्ड फार्मास्युटिकल्स या कंपनीच्या संचालक असलेल्या शिवबाई चांदवड यांनी सोलापूर जिह्यातील मोहोळ बार्शी रोड येथे आपल्या कंपनीसाठी वीज जोडणी देण्यात यावी म्हणून महावितरणकडे अर्ज केला. अनेक वर्षे उलटूनही महावितरणच्या संबधित इंजिनीयरने कोणतेच काम केले नाही म्हणून चांदवड यांनी महावितरण ग्राहक तक्रार निवारण मंच, बारामतीकडे तक्रार केली. याप्रकरणी मंचाने नुकसानभरपाई म्हणून संबंधित इंजिनीयरला 50 हजारांचा दंड ठोठावला. या निर्णयाविरोधात आव्हान देत संबंधित कर्मचाऱ्याने हायकोर्टात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्यासमोर पार पडलेल्या सुनावणीत अॅड. विनोद सांगवीकर यांनी मारीगोल्ड फार्मास्युटिकल्स कंपनीच्या संचालिका शिवबाई चांदवड यांची बाजू मांडताना सांगितले की, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कंपनीचे जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे पैसे संबधित कर्मचाऱ्याकडून वसूल करण्याचे आदेश हायकोर्टाने द्यावे अशी मागणी केली. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत महावितरण ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिलेला निकाल कायम ठेवला.