
ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पात लागलेल्या आगीमुळे उरणच्या वीज प्रकल्पाला होणारा गॅसचा पुरवठा तिसऱ्या दिवशीही ठप्पच आहे. त्यामुळे महानिर्मितीला दररोज तब्बल दोन कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महानिर्मितीच्या उरण येथील गॅसवर चालणाऱ्या वीज प्रकल्पाची 672 मेगावॅट एवढी वीजनिर्मिती क्षमता आहे. गॅसच्या अपुऱ्या पुरवठय़ामुळे सध्या येथून दररोज सुमारे 250 मेगावॅट एवढी वीजनिर्मिती सुरू होती, मात्र गॅसचा पुरवठा बंद झाल्याने वीजनिर्मिती ठप्प आहे. दररोज 250 मेगावॅट क्षमतेने वीज प्रकल्प चालल्यास तब्बल 60 लाख युनिट वीज तयार होते.
येथील प्रतियुनिट विजेचा दर सुमारे 3 रुपये असल्याने जवळपास 1 कोटी 80 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याची माहिती महानिर्मितीच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. तसेच आणखी किती दिवस गॅस पुरवठा बंद राहणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.























































