
सामना ऑनलाईन । मुंबई
वीज ग्राहकाकडून पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महावितरणचे बुलडाणा येथील सहाय्यक अभियंता अनंत वराडे याला अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
बुलडाणा जिह्यातील चांदूरबिस्वा येथील एका वीजग्राहकाच्या वीज मीटरमध्ये बिघाड झाला होता. हा बिघाड संबंधित ग्राहकाने स्वतःहून दुरुस्त केल्याचा आरोप महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केला होता. तसेच हे प्रकरण मिटवण्यासाठी पाच हजार रुपये दे, अन्यथा महावितरणच्या मलकापूर कार्यालयात पंधरा हजार रुपये दंड भरावा लागेल, असा निरोप वराडे यांनी कंत्राटी वीज कामगाराकडे पाठवला होता. त्यानुसार नंदुरा येथील पंचायत समिती कार्यालयासमोर पाच हजार रुपये घेताना कंत्राटी कामगार प्रवीण चिमणकर याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. यावेळी सदर रक्कम आपण अनंत वराडे यांच्या सांगण्यावरून घेतली असल्याची कबुली दिली. त्यानुसार तत्काळ वराडे यांना अटक करण्यात आली.





























































