एसटीला विठ्ठल पावला! आषाढीवारीत 9 लाख वारकऱ्यांची वाहतुकीतून मिळाले 28 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वसामान्यांसाठी गावखेडय़ापर्यंत धावणाऱ्या एसटीला आषाढीवारीत साक्षात विठ्ठल पावला आहे. वारीनिमित्त एसटी महामंडळाने पाच हजार बसच्या माध्यमातून तब्बल 8 लाख 81 हजार वारकऱ्यांना पंढरपूरची वारी घडवली आहे. त्या माध्यमातून एसटीला 27 कोटी 88 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यामुळे आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या महामंडळाला मोठा दिलासा मिळाला आहे.

आषाढीवारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये तसेच परतीच्या प्रवासात त्यांना सहजपणे आपल्या गावी पोहोचता यावे म्हणून 25 जून ते 5 जुलैदरम्यान एसटीने पाच बसच्या माध्यमातून 17 हजार 566 फेऱ्यांमधून 8 लाख 81 हजार 665 प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे. तसेच 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास व महिलांना पन्नास टक्के सवलतीत प्रवास उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, मागील वर्षीचा विचार करता महामंडळाने यंदा तब्बल 2 लाख 45 हजार 670 वाढीव वारकऱ्यांची वाहतूक केली आहे.