
कोरोनाच्या संकटाचा बीड जिल्ह्याला मोठा फटका बसला. मृत्युची संख्या 1915 च्या घरात गेली. अजूनही कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत असताना बीड जिल्ह्यामध्ये नवे संकट उभे राहिले आहे. म्युकरमायकोसीसीचा विळका अधिक घट्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन महिन्यामध्ये बीड जिल्ह्यात 81 रूग्ण सापडले आहेत. यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर 56 जणांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत बीड जिल्ह्याला जेवढा फटका बसला त्याच्यापेक्षा चारपट फटका दुसऱ्या लाटेत बसला. दुसऱ्या लाटेमध्ये मृत्युचा दर वाढला. पॉझिटिव्ह रेटही 30 टक्क्यापर्यंत पोहचला होता. आतापर्यंत 1915 जणांनी आपला जीव गमावला. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम काही प्रमाणात दिसत आहे. गेल्या आठवडाभरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या धिम्या गतीने का होईना कमी होत आहे. एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे म्युकरमायकोसीसचा विळखा अधिक घट्ट होतोय की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या आजारावर उपचार घेण्यासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयामध्ये स्वतंत्र उपचार कक्षही स्थापन करण्यात आले. गेल्या दोन महिन्यात या आजाराने 81 रूग्णांना ग्रासले आहे. त्यातील 56 रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. 15 रूग्णांची या आजारातून मुक्तता झाली आहे. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे 11 म्युकरमायकोसीस रूग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतिक्षेत आहेत. या आजारात रूग्णांना भूल देत शस्त्रक्रिया करावी लागते. त्यामुळे ते कोरोनामुक्त होण्याची गरज आहे. अंबाजोगाईतील स्वाराती रूग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन रूग्णांना प्रत्येकी एक डोळा गमवावा लागला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या आजारातील बहुसंख्य रूग्ण हे पोस्ट कोविडचे असून सर्वाधिक रूग्ण 50 वयोगटाच्या पुढील आहेत तर चार रूग्ण तरूण आहेत.




















































