पहिलं गाणं संगीतबद्ध केलं!

807

>> मुग्धा वैशंपायन, गायिका

मी मूळची अलिबागची आहे. शिक्षणासाठी मी गेली पाच वर्षे मुंबईत राहते. लॉकडाऊन सुरू होण्याच्या काही दिवस आधी मी अलिबागला आले. मी अंतिम वर्षाला आहे. माझी टीवायबीएस्सीची सहावी सेमिस्टर सुरू आहे. जनता कफ्र्यू लागला त्यादरम्यान आमच्या प्रॅक्टिकल परीक्षा होत्या. थोडे दिवस कॉलेज बंद राहील असं समजलं. त्यानंतर मी 15 दिवस अभ्यासाची सुट्टी समजून अलिबागला आईबाबांकडे आले. अगदी मोजकेच पंधरा दिवसांचे कपडे घेऊन आले. लॉकडाऊन पुढे इतकं वाढेल याचा विचारही आला नाही.

माझी म्युझिकल अॅक्टिव्हिटीची साधनं म्हणजे आयपॅड, स्पीकर या सगळ्या गोष्टी मुंबईत राहिल्यात. सध्या मी घरातच सगळ्यांसोबत आहे. ‘सारेगमप’ झाल्यानंतर इतक्या वर्षांनी दीर्घकाळ मी आईबाबांसोबत राहू शकले. त्यामुळे लॉकडाऊनचा तसा फायदा झाला असं म्हणावं लागेल.

मी दीड वर्षापूर्वी स्वतःचं यू ट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. पण झालं असं की, आम्ही प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असायचो. माझं तर अभ्यास आणि गाण्यांचे कार्यक्रम असं सुरू असायचं. त्यामुळे यू ट्यूब चॅनेलला नीट न्याय देऊ शकत नव्हते. मात्र आता मिळालेल्या वेळेत मी माझ्या यू ट्यूब चॅनेलवर पूर्ण लक्ष देऊ शकले. सुरुवातीला मी फेसबुक, इन्स्टा लाइव्ह केलं. पण काही दिवसांनी त्यातील नावीन्य कमी झालं असं वाटलं. मग मी लाइव्ह कमी केलं. अगदी बंदच केलं म्हणा. त्यानंतर मी यू ट्यूब अॅक्टिव्हिटी सुरू केल्या. मी पहिल्यांदा स्वतःचं गाणं स्वतः संगीतबद्ध केलं. ते गायलं, रेकॉर्ड केलं आणि यू ट्यूब चॅनेलला लाँचही केलं, ही सुरुवात मी अक्षय्यतृतीयेपासून केली.

लॉकडाऊनमध्ये मी संगीतप्रेमींसाठी ‘यादों में’ ही सीरिज घेऊन आले. शंकर जयकिशन, मदन मोहन, एस डी बर्मन, ओ. पी. नय्यर अशा दिग्गजांनी संगीतबद्ध केलेली गाणी प्रत्येक आठवड्याच्या गुरुवारी मी यू ट्यूब चॅनेलवर घेऊन येते. सगळं मी स्वतःच करते. शूटिंग करण्यासह अगदी व्हिडीओ एडिटिंगही करते. मी या सगळ्या नवीन गोष्टी केल्या याचा मला खूप आनंद होतोय. जेव्हा टेक्निकली स्वतःचं स्वतः करतो त्याचा आनंद कमाल असतो असं आतापर्यंत ऐकलं होतं; पण आता अनुभवलंही. शेवटी एवढंच सांगेन की, गाणे हे सगळ्यावरचं उत्तम औषध आहे. गाण्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे. मी स्वतः गायिका असल्याने त्याचा अनुभव घेतेच. तुम्हीही गाणं ऐकत रहा आणि आनंदी रहा.

आपली प्रतिक्रिया द्या