मुगले आझम! भव्य आणि अलौकिक, रुपेरी मानदंडाची 60 वर्षे

663

मुगले आझम’ म्हणजे हिंदुस्थानी सिनेसृष्टीच्या गौरवशाली परंपरेचे शिखर! केवळ भव्य, भव्य आणि भव्य अशा शब्दांतच सिनेमाचं वर्णन करावं लागेल. सगळंच अद्भुत आणि अलौकीक! अशी कलाकृती बनवेन जी याआधी झाली नाही आणि भविष्यात होणार नाही, अशी प्रतिज्ञा घेऊन दिग्दर्शक के. आसिफ यांनी पडद्यावर त्यांचे भव्यदिव्य स्वप्न साकारले. मधुबाला, दिलीपकुमार, पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे यांच्या कसलेल्या अभिनयाने सजलेला ‘मुगले आझम’ 5 ऑगस्ट 1960 रोजी प्रदर्शित झाला होता. बुधवारी मुगले आझमला 60 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त अनेकांनी सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिलाय.

‘मुगले आझम’ या भव्यपटाचे निर्माता शापूरजी पालनजी मेस्त्री हे पितापुत्र होते. आजच्या दिवसाचे औचित्य साधून शापूरजी पालनजी ग्रूपचे संचालक आणि सीईओ दीपेश सल्गिया यांनी सिनेमाचा सुवर्णकाळ जागवला. ‘मुगले आझम’ हा सिनेमा दिलीप कुमार आणि मधुबाला यांनी पडद्यावर साकारलेल्या सलीम अनारकलीच्या अमर प्रेमकथेसाठी ओळखला जातो. मात्र शापूरजी पालनजी हे पृथ्वीराज कपूर यांचे खूप मोठे फॅन होते. त्यांच्यासाठी पृथ्वीराज कपूर हेच खरे हिरो होते, असे दीपेश सल्गिया यांनी इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. गेल्या 60 वर्षांत मुगले आझमची जादू कणभरही कमी झालेली नाही. पुढे हा सिनेमा रंगीत स्वरूपात आला, नाटक आणि पुस्तकांच्या रूपातही रसिकांच्या मनात राहिला. आज शापूरजी असते तर खूश झाले असते, असे साल्गिया म्हणाले.

  •  ‘मुगले आझम’ 1960 साली प्रदर्शित झाला. त्या काळी दीड कोटी रुपये सिनेमाचे बजेट होते. सिनेमा पूर्ण व्हायला नऊ वर्षांचा कालावधी लागला.
  • मुगल दरबारचा सेट उभारण्यासाठी 10 महिने लागले तर फिल्मच्या शूटिंगला 10 लाख फूट नेगेटिव्ह लागले.
  •  ‘ए मोहब्बत जिंदाबाद’ गाण्यासाठी 100 कोरस सिंगर घेण्यात होते. युद्धाच्या शूटिंगसाठी आठ हजार जवान, दोन हजार उंट आणि चार हजार घोडे वापरण्यात आले.
  • 12 नोव्हेंबर 2004 साली ‘मुगले आझम’ रंगीत आणि सिक्स ट्रक डॉल्बी साऊंडमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. पुढे 19  फेब्रुवारी 2014 पर्यंत देशातील 14 थिएटरमध्ये सलग 25 आठवडे सिनेमा चालला.
आपली प्रतिक्रिया द्या