वर्षभरात अंबानींची संपत्ती सवालाख कोटींनी वाढली

जगात मंदीचे वातावरण असतानाच रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी मात्र 2019 या वर्षाचे आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. या वर्षभरात त्यांनी आपल्या संपत्तीमध्ये तब्बल 17 अब्ज डॉलर्स (जवळपास 1.21 लाख कोटी रुपये) जादा जमवल्याचे ‘ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स’ने मंगळवारी आपल्या यादीत नमूद केले आहे.

गेल्या वर्षभरात मुकेश अंबानी यांच्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपनीच्या शेअर्समध्ये घसघशीत 40 टक्क्यांनी वाढ झाल्याचेही यादीत नमूद करण्यात आले आहे. ‘अलीबाबा’चे संस्थापक जॅक मा हे या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांच्या संपत्तीमध्ये 11.3 अब्ज डॉलर्सची वाढ झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे ऍमेझॉनचे प्रमुख जेफ बेझॉस यांच्या संपत्तीत मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत 13.2 अब्ज डॉलर्सची घट झाल्याचेही यादीत नमूद करण्यात आले आहे.

रिलायन्सचा वाटा मोठा

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सचे 2016 साली जे भाव होते, आजघडीला त्याच्या तिप्पट भाव आहेत. तरीही गुंतवणूकदार त्यात बेधडक गुंतवणूक करायला धडपडतात. कारण या शेअर्समधून त्यांना हमखास फायदा होतो. टेलिकम्युनिकेशन आणि रिटेल क्षेत्रात मुकेश अंबानी यांनी पाऊल ठेवले तेव्हा तेथेही गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स मोठय़ा संख्येने घेऊ लागले. अंबानी यांनी जिओवर आतापर्यंत 50 अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. दूरसंचार क्षेत्रात इतर कंपन्यांना फटका बसत असतानाच जिओने मात्र या वर्षी दुसऱ्या तिमाहीत 990 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या