मुकेश अंबानीं जगातील श्रीमंतांच्या Top 10 यादीतून बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून लौकीक मिळवलेले मुकेश अंबानी यांचे जागतिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील स्थान घसरले आहे. या घसरणीमुळे ते सर्वात श्रीमंत 10 व्यक्तींच्या यादीतून बाहेर गेले आहेत. ब्लूमबर्ग बिलिअनर्स इंडेक्सने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. मुकेश अंबांनींकडे 102 अब्ज डॉलर्सची संपत्ती असून ते जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आता 11 व्या क्रमांकावर गेले आहेत. या वर्षी त्यांच्या संपत्ती 25.2 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. वॉरन बफे यांनी मुकेश अंबानी यांचे 10 स्थान पटकावले असून त्यांची संपत्ती 103 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. अडाणी ग्रुपचे सर्वेसर्वा गौतम अडाणी हे या यादीत 13 व्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे 77.7 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर टेस्लाचे इलॉन मस्क असून त्यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मस्क यांची संपत्ती 66.5 अब्ज डॉलर्सने वाढून आता 236 अब्ज डॉलर्स झाली आहे. मस्क यांनी अमेझॉनचे जेफ बेझोस यांना संपत्तीच्या बाबतीत बरंच मागे टाकलं आहे. बेझोस यांच्याकडे 197 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. बर्नार्ड आरनॉल्ट हे यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे 164 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस हे 130 अब्ज डॉलर्सचे मालक असून ते या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग हे या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत.