
>> डॉ. मुकुंद कुळे
ओणम हा केरळमधला प्रसिद्ध सण असुरराज बळीराजाच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जातो. मात्र ओणम हा बळीचा नाही, तर वामनाचा सण असल्याची हाकाटी गेल्या काही वर्षांत उजव्या विचारसरणीच्या अभिजनांनी सुरू केली आहे. त्याची घेतलेली झाडाझडती.
मिथकांचा वापर करून बहुजनांचा बुद्धिभ्रम करायचा आणि आपल्याला हवं ते साध्य करून घ्यायचं हा आतापर्यंत अभिजनांनी वापरलेला सोपा पैंतरा आहे. किंबहुना, याच आधारे आजवर त्या-त्या काळातील अभिजन समाजाने बहुजन समाजावर सांस्कृतिक वर्चस्व गाजवलं आणि विविध कर्मकांडांचा धाक दाखवत त्याला आपल्या कह्यात ठेवलं. सनातनी हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मंडळींनी पुन्हा एकदा तेच जुनं शस्त्र परजायला सुरुवात केली आहे. वास्तविक केरळमधला ओणम हा सण असुरराज बळीराजाच्या आगमनाप्रीत्यर्थ साजरा केला जातो. असं असताना तथाकथित सनातन्यांनी मात्र आपल्या स्वार्थासाठी बळीराजाऐवजी त्याला पाताळात धाडणाऱया वामनाला पुढे आणण्याचं कारस्थान गेल्या काही वर्षांत रचायला सुरुवात केली आहे. यंदा ऑगस्ट महिन्यात ओणम साजरा झाला. त्या वेळीही याची पुन्हा एकदा प्रचीती आली. कृषी परंपरेशी संबंधित असलेल्या बळीराजाच्या आगमनाच्या शुभेच्छा देण्याऐवजी वामनावताराच्या शुभेच्छा या मंडळींनी दिल्या.
केरळी संस्कृतीनुसार त्यांच्या चिंगम महिन्यात (ऑगस्ट-सप्टेंबर) येणारा ओणम हा सण समृद्धीचा, संपन्नतेचा सण म्हणून ओळखला जातो. कारण या दिवसांत शेतात पेरलेलं धनधान्य कापणीला आलेलं असतं. एक प्रकारे हा थेट कृषी संस्कृतीशी नातं सांगणारा सण आहे. त्यामुळेच तब्बल दहा दिवस साजऱया होणाऱया या सणाच्या दिवसांत मल्याळी बांधव अधिकाधिक निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. या दहा दिवसांत नवनवे कपडे घालून एकमेकांना आवर्जून भेटवस्तू तर दिल्या जातातच, पण त्याचबरोबर घराचं अंगण सारवून तिथे दहा दिवस फुलांची रांगोळी काढली जाते. ही रांगोळी रोज नवीन न काढता पहिल्या दिवशी काढलेली रांगोळीच रोज थोडी थोडी वाढवली जाते. त्यासाठी मुद्दाम रोज सकाळी जंगलात जाऊन विविध तऱहेची, रंगांची फुलं आणली जातात. रोज वाढवली जाणारी ‘पुक्कलम’ नावाची ही फुलांची रांगोळी म्हणजे वाढत्या समृद्धीचं प्रतीक. याशिवाय रोज रात्री रंगणारी नाचगाणी आणि नौका स्पर्धांसारखे खेळ मानवाचं निसर्गाशी असलेलं सान्निध्यच सूचित करतात.
मात्र ओणम केवळ कृषी संस्कृतीच्या आठवणी जागवणारा सण नाही. तो एक सांस्कृतिक संघर्ष अधोरेखित करणारा सणही आहे. किंबहुना, कृषी संस्कृतीतील महान राजा बळी याच्या स्मृतिप्रीत्यर्थच ओणम साजरा केला जातो. दैत्यराज म्हणून ओळखल्या जाणाऱया बळीराजाच्या राजवटीत केरळमधली जनता सुखी आणि समाधानी होती. बळीराजाच्या न्याय्य राजवटीमुळे प्रत्येकाच्या घरात सुख आणि समाधान होतं. परिणामी बळीराजाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली होती. मात्र हीच लोकप्रियता देवांना मानवली नाही आणि त्यांनी विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या वामनाची निर्मिती करून बळीराजाला पाताळात धाडलं (की कपटाने मारलं?). मात्र मारलेलं असो की वामनाने तिसरं पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात धाडलेलं असो, बळीराजा संपला मात्र नाही. तो आपल्या जनतेला भेटण्यासाठी पुन: पुन्हा येत राहिला. त्यांचं कुशलमंगल विचारत राहिला. केरळमध्ये साजरा होणारा ओणम म्हणजे हेच तर आहे. बळीराजा आपल्या जनतेला भेटायला पाताळातून यायला निघतो तो ओणमचा अथम म्हणजे पहिला दिवस मानला जातो, तर सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा म्हणजे दहावा दिवस थिरुओणम म्हणून ओळखला जातो. या दिवशी आपल्या जनतेला भेटून बळीराजा पुन्हा पाताळात जायला निघतो. हा दिवस केरळमधील जनतेसाठी एक प्रकारे दुःखाचाच असतो. कारण त्यांचा आवडता प्रजादक्ष राजा पुन्हा पाताळात जायला निघालेला असतो. मग “पुढच्या वर्षी लवकर ये भेटायला” असं त्याच्याकडून आश्वासन घेऊन त्याला वाजत गाजत निरोप दिला जातो.
हे वर्षानुवर्षे सुरू आहे. शतकं उलटली, सहस्रकं मागे सरली तरी केरळशी असलेलं बळीराजाचं नातं संपलं नाही. उलट दरवर्षी ते वाढतच आहे आणि तेच आता पुन्हा अभिजनांच्या डोळ्यांत खुपू लागलं आहे. कारण बळीराजा शेवटी असुर होता. मग त्याची लोकप्रियता कशी सहन होणार? त्यामुळेच पुन्हा एकदा बळीराजाला पाताळात धाडण्यासाठी सनातनी मंडळी सिद्ध झाली आहेत. म्हणून तर काही वर्षांपूर्वी आरएसएसच्या केरळमधील मुखपत्र असलेल्या ‘केसरी’ मासिकाच्या ओणम विशेषांकात ओणम हा राक्षसांचा राजा महाबलीच्या आगमनाप्रीत्यर्थ साजरा केला जाणारा सण नाही, तर तो वामनाच्या जन्मानिमित्त साजरा केला जाणार सण असल्याचं म्हटलं होतं. मात्र पुराणकाळातला बळीराजा फारच सुस्वभावी, सोशीक आणि नम्र होता. राक्षसांचे गुरू असलेल्या पाचार्यांनी आधीच देवांच्या कारस्थानाची माहिती दिलेली असतानाही आणि वामनाला “तू कुठलंही वचन देऊ नकोस” असं सांगितलं असतानाही त्याने याचकाचा मान राखला नि वामनाने आपलं तिसरं पाऊल अखेर त्याच्याच डोक्यावर ठेवल्यामुळे पाताळात गेला. मात्र बळीराजाला आपल्या बहुजन संस्कृतीत जपून ठेवणारी आजची केरळ किंवा उर्वरित हिंदुस्थानातली जनता सनातन्यांच्या या खेळीला आता फसणारी नाही. त्यांनी परंपरावाद्यांच्या या कृतीचा तीव्र निषेध केला. केरळमध्ये सत्ता असलेल्या ‘माकप’च्या ज्येष्ठ नेत्या आणि केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी त्यावेळी याला कडाडून विरोध करताना “उच्चवर्णीयांचे श्रेष्ठत्व ठसविण्याचा आरएसएसचा हा डाव आहे. तसंच हा सण हायजॅक करण्याचाही आरएसएसचा अजेंडा आहे” असं म्हटलं होतं.
शैलजा यांच्या या उक्तीत असत्य असं काहीच नाही. कारण संघ आणि तत्सम वैचारिकता असणाऱयांनी कायम हीच नीती अवलंबली आहे. दैवतांपासून रीतिरिवाजांपर्यंत बहुजन समाजात जे जे लोकप्रिय झालं, ते अभिजन वर्गाने आधी आपलंसं केलं आणि मग बहुजन वर्गाचा त्यावरचा ठसा पुसून टाकला. विठोबा-खंडोबा ही त्याची मूर्तिमंत उदाहरणं आहेत. गुराखी आणि धनगर समाजाच्या या लोकदेवता आता उभ्या महाराष्ट्राच्या उपास्य देवता झाल्या आहेत, पण आपल्या मूळ समाजापासून मात्र दूर गेल्या आहेत. याच प्रकारे बळीराजाचं अस्तित्व पुसण्यासाठी आता ओणम हायजॅक करण्याचा संघाचा डाव आहे, परंतु या वेळी केरळच नाही, तर सगळ्यांनीच बळीराजाच्या रक्षणासाठी पुढे येण्याची गरज आहे. कारण बळीराजा केवळ केरळचा नाही. हिंदुस्थानातल्या कृषी परंपरेशी निगडित असलेल्या प्रत्येकाशी बळीराजाचं नातं जोडलं गेलंय. शेवटी बळीराजा हा कृषी संस्कृतीचा कर्ताधर्ता होता. बळीचं राज्य हे शेतकरी राजाचं राज्य होतं. केवळ त्यामुळेच आजही हिंदुस्थानी परंपरेत बळीराजा टिकून आहे. केवळ महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तरी दिवाळीत साजरी होणारी बलिप्रतिपदा (पाडवा) ही अनेक समाजात बळीराजाचे उपकार स्मरण्यासाठीच साजरी केली जाते. रायगड जिह्यातील आगरी समाजात बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी अंगणात चौकोनी रांगोळी काढून बळीराजाचं प्रतीक म्हणून चार दिशांना चार, तर मध्यभागी एक असे शेणाचे पाच गोळे ठेवले जातात. त्या गोळ्यांवर गोंडय़ाचं फूल ठेवून त्यांची पूजा करून नंतर हे गोळे घरावर फेकले जातात. बळीची समृद्धी आपल्या घरात यावी हा त्यामागचा उद्देश असतो. याचप्रमाणे मराठवाडय़ातील गुराखी समाजात दिवाळीच्या दिवसांत…
आलं आलं मर्दाचं घोडं
उघडा उघडा बळीराजाचं कवाडं
इडापिडा टळू दे
नि बळीचं राज्य येऊ दे…
अशी गाणी आजही म्हटली जातात. अगदी मुंबईसारख्या ठिकाणी वस्तीला असलेल्या उच्चशिक्षित आणि श्रीमंत पाठारे प्रभू समाजातही बलिप्रतिपदेला बळीराजाच्या मूर्तीची खास पूजा केली जाते. संपूर्ण हिंदुस्थानात बहुधा पाठारे प्रभू समाजातील कुटुंबांतच घोडय़ावर बसलेली बळीराजाची धातूची मूर्ती पाहायला मिळते. या मूर्तीची पाडव्याला पहाटे पूजा करून पाठारे प्रभू महिला घरातील सगळा कचरा घराबाहेर टाकतात आणि म्हणतात, “इडापिडा टळो, बळीचं राज्य येवो.” म्हणजे या सर्व घटनांतून बळीराजा समृद्धीचं प्रतीक असल्याचंच सूचित होतं. फक्त तो असुर असल्यामुळे त्याला आजवर अभिजनांनी नाकारलं, परंतु यापुढे त्यांना ते जमणार नाही. कारण बहुजनांना आता मिथकं आणि प्रतिमा-प्रतीकांची भीती उरलेली नाही. मग भले कितीही वामन परतून येवोत!





























































