
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (सीबीएसई) च्या ऑन-स्क्रीन मार्किंग सिस्टीममध्ये अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. स्कॅन केलेल्या अस्पष्ट प्रती तपासणे, शुल्क भरूनही स्टेटस प्रलंबित दाखवण्यापासून ते सीबीएसईच्या पोस्ट-व्हेरिफिकेशनचे सर्व्हर डाउन झाल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांना स्कॅन केलेल्या प्रती मिळवण्यासाठी आणि पुनर्मूल्यांकनासाठी सीबीएसईच्या पोस्ट-व्हेरिफिकेशन पोर्टलवर अर्ज करतानाही अनेक तांत्रिक अडचणी आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
उत्तरपत्रिकेची स्कॅन केलेली प्रत पाहण्यासाठी विद्यार्थ्यांकडे 5 दिवस होते, त्यापैकी 3 दिवस पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे वाया गेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. सीबीएसई बोर्डाने अर्जासाठी 19 ते 23 मे 2026 पर्यंतच्या तारखा निश्चित केल्या होत्या. परंतु सलग तिसऱ्या दिवसापर्यंत वेबसाईटमध्ये तांत्रिक समस्या उद्भवल्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका पाहता आल्या नाहीत, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांना अजूनही अर्ज करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेबसाइटवर पेमेंट 100 रुपयांऐवजी तब्बल 8 हजार रुयपे दाखवत होते. अनेक जण सीबीएसईचे पोर्टल हॅक झाल्याचा दावा करत आहेत.
बोर्डाचा दावा वेबसाईट सुरळीत
तपासलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती इतक्या खराब दर्जाच्या स्कॅन केल्या आहेत की स्वतःचे लिहिलेले वाचणेही कठीण आहे. विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. सीबीएसईने अद्याप यावर कोणतेही अधिकृत निवेदन जारी केले नसले तरी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये बोर्डाने दावा केला की, आता वेबसाइट अगदी व्यवस्थित काम करत आहे.
























































